
सामना प्रतिनिधी । नागपूर
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली असली तरी अजूनही दुरावा गेलेला नाही. नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचाराकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली असून सर्व नेते भंडारा-गोंदिया येथील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी डेरेदाखल झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप सेनेची महायुती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. उभयतांचे उमेदवार सर्वच मतदारसंघांत लढत देणार आहेत. खरा सामना महायुती व आघाडीच्या उमेदवारांतच होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांत धुसफूस सुरूच आहे.
2014 साली नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे पटेल यांचा पराभव करणारे नाना पटोले यांचा प्रचार कसा करायचा, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचे ईश्वर बाळबुधे, अनिल अहिरकर हे दोन-चार नेते सोडले तर इतर नेते पटोलेंच्या प्रचारात दिसेनासे झालेले आहेत. काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी संपली असून सर्व नेते नाना पटोलेंच्या प्रचारात व्यस्त असल्याचे बोलले जात असले तरी अनेक काँग्रेसचे नेते प्रचारासाठी अद्याप घराबाहेर पडले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय नाना पटोले यांनी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून भंडारा येथून कार्यकर्ते प्रचारासाठी बोलावले आहेत.
आमच्यावर नानांचा विश्वास नाही का?
स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत त्यांचा एक कार्यकर्ता राहणार आहे. त्यामुळे आमच्यावर नानांचा विश्वास नाही काय, असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत. निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी खर्च करणे अपेक्षित असते. परंतु नानांनी अजून खिशात हात टाकलाच नाही. कार्यकर्त्यांना चहालासुद्धा पैसे दिले जात नाहीत. कार्यकर्त्यांना स्वतः आपला खर्च करावा लागत आहे. पण हा खर्च किती दिवस आम्ही करायचा? नानांकडे यासंदर्भात विचारणा केल्यास ते म्हणतात, सध्या करा ना. मी व्यवस्था करतो, असे सांगून ते खर्चाविषयी टोलवाटोलवी करीत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
प्रचारात गडकरींची आघाडी
नागपूर मतदारसंघात नागपूर शहराचाच बहुतांश सर्व भाग समाविष्ट असून मध्य नागपूर, पूर्व नागपूर, पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर आणि दक्षिण-पश्चिम नागपूर अशा सहा विधानसभा क्षेत्रांचा यात समावेश आहे. प्रचारासाठी उमेदवारांजवळ कमी अवधी असला तरी यात नाना पटोलेंपेक्षा गडकरी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.



























































