
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ब्राह्मण समाजाची बदनामी करणाऱ्या, प्राणाची बाजी लाऊन देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्य दलात जात पात आणून सैन्य दलाचा व पर्यायाने राष्ट्राचा अपमान करणाऱ्या राजू शेट्टी यांचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने निषेध केला आहे. तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगात तक्रार दाखल करून निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगणे तालुक्यात हेरले येथे निवडणूक प्रचारादरम्यान ब्राह्मण समाजाची बदनामी करणारे वक्तव्य केले होते. सीमेवर आमची पोरं जातात, कोणा देशपांडे, कुलकर्णींची पोरं जात नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य करून राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाची बदनामी केली होती. या वक्तव्यानंतर ब्राह्मण समाजामध्ये राजू शेट्टी यांच्याबद्दल तीव्र असंतोष असून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने याचा निषेध केला आहे.
स्वातंत्र्य पूर्वोत्तर काळातील मंगल पांडे पासून ते आता पाकिस्तानला धडा शिकवणारे विंग कमांडर अभिनंदन, तसेच पहिल्या ‘परमवीर चक्र’चा सन्मान मिळवणारे शर्मा यासह अनेक ब्राह्मण समाजातील लोकांनी देशासाठी योगदान दिले आहे. अनेक ब्राह्मण जवान देशासाठी शहीद झाले आहेत. असे असताना विनाकारण ब्राह्मण समाजाची बदनामी करण्यासाठी राजू शेट्टी यांनी बेताल वक्तव्य केले. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची कोणतीही जात नसते. ‘देशसंरक्षक’ ही एकच जात सैनिकांची असते. असे असतानाही राजू शेट्टी यांच्यासारख्या लोकप्रतिनिधिंनी असे बेताल वक्तव्य करणे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारे आहे.
या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या जातीवादी वक्तव्याची तपासणी करून राजू शेट्टी यांच्यावर आचारसंहिताभंगाती कारवाई करावी व स्वाभिमान शेतकरी संघटनेला निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे संघटक चिन्मय फाटक यांनी निवडणूक आयोगाक़डे केली आहे. आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करते यावर सर्वांचे लक्ष आहे.
































































