
सामना प्रतिनिधी । लंडन
‘टीम इंडिया’ने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत आपल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अभियानाला प्रारंभ केला. या लढतीपूर्वी ‘आयसीसी’ने हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीचे दोन फोटो ट्विट केले. एका फोटोत त्यांनी कोहलीला हॅरी पॉटर, तर दुसर्या फोटोत महाराजा दाखवला. मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनचा ‘आयसीसी’कडून कोहलीच्या झालेल्या सन्मानामुळे जळफळाट झाला. त्याने ट्विट करून यात निष्पक्षपातीपणाचा अभाव असल्याचे सांगत कोहलीला टोमणाही हाणला, मात्र आयसीसीनेही पलटवार करून वॉनची बोलतीच बंद केली.
‘आयसीसी’ने कोहलीने केलेल्या ‘विराट’ कामगिरीच्या जोरावर मिळालेल्या पुरस्कारांची लिस्टच ट्विटरवर टाकली. यामध्ये विराट कोहलीने आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम कसोटीपटू, सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू, सर्वोत्तम कसोटी कर्णधार व सर्वोत्तम एकदिवसीय कर्णधार हे पुरस्कार पटकाविल्याचा पुरावाच सादर केला. विराट कोहली क्रिकेटविश्वातील सध्याचा ‘नंबर वन’ खेळाडू असून त्याच्या नावावर भरमसाट पुरस्कारही जमा आहेत, असे सांगितल्यानंतर मायकल वॉनने प्रत्युत्तरच दिले नाही.




























































