
सामना प्रतिनिधी । न्यूयॉर्क
हिंदुस्थानचा ऑलिम्पियन बॉक्सर विजेंदर सिंग याने बॉक्सिंगच्या रिंगणात अमेरिकन प्रतिस्पर्धी माईक स्नायडरला दमदार पंचेस लगावत 11 व्या विजयाला गवसणी घातली. या धडाकेबाज विजयामुळे हिंदुस्थानच्या पठ्ठय़ाची व्यावसायिक बॉक्सिंगमधील विजयी घोडदौड कायम राहिली हे विशेष.
रविवारी पहाटे विजेंदर सिंग आणि माईक स्नायडरमध्ये अमेरिकेच्या नेवार्क (न्यूजर्सी) येथे हा सामना रंगला. विजेंदर सिंगने माईक स्नायडरला आठ राऊंडच्या मिडलवेट कॉन्टेस्टमध्ये नॉकआऊट करत जेतेपद पटकावले. या सामन्यानंतर 33 वर्षीय विजेंदर सिंगने सर्वांचे आभार मानत या लढतीचा व्हिडीओही ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘गानअर्पित, प्राण अर्पित, रक्त का कण-कण समर्पित। चाहता हूं देश की धरती, तुझे कुछ और भी दूं।,’ विजयानंतर त्याने अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. विजेंदर सिंगने आतापर्यंत 11 सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यातील आठ सामन्यांत तर त्याने नॉकआऊटद्वारे विजय मिळवला आहे.






























































