खंड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

पाण्याला धरून राहणारा हा देखणा पक्षी पक्का मत्स्याहारी आहे.

खंडय़ा हे पक्षी लहान ते मध्यम आकाराचे असून आकर्षक रंगाचे असतात. हिरव्या -निळ्या पंखांच्या सामान्य खंडय़ाला नगर शहराचा पक्षी’ असा सन्मान मिळाला आहे. खंडय़ा पक्ष्यांचे वास्तव्य संपूर्ण जगात आढळते. या पक्ष्यांचे वास्तव्य नदीकिनारी, तलावाजवळ, शेतात, माळरानात, जंगलात तसेच शहरात असते. नर व मादीमध्ये फारच थोडा फरक असतो. खंडय़ा पक्ष्यांची सर्वात छोटी प्रजाती आफ्रिकन ठेंगू खंडय़ा असून बहुतेक खंडय़ांचे पंख हिरव्या किंवा निळ्या रंगांचे असून पंखांच्या विशिष्ट रचनेमुळे निळा प्रकाश विखरतो व पंख अतिशय तेजस्वी दिसतात.

खंडय़ा पक्ष्यांचे डोके मोठे असून त्यांची कटय़ारीसारखी चोच लांब, तीक्ष्ण व टोकदार असते. शेपटी खुंटासारखी आखुड व जाड असते. माशांची शिकार करणाऱया खंडय़ांची चोच लांब व अरुंद असते तर जमिनीवरील किडे, कीटक पकडणाऱया खंडय़ांची चोच छोटी व रुंद असते. या पक्ष्यांचे पाय लहान असून त्याला चार बोटे असतात. त्यापैकी तीन बोटे पुढच्या बाजूला असतात. बहुतेक प्रजातींची बुबुळं गडद तपकिरी असतात. या पक्ष्यांची दृष्टी दुर्बिणीसारखी असून रंगाची पारख चपखल असते. एखाद्या सावजाचा मागोवा हे पक्षी डोके हलवून घेतात. कारण यांच्या डोळ्यांची हालचाल मर्यादित असते. या पक्ष्यांना पाण्याची खोली अचूक समजते. यांच्या डोळ्यावर एक पडदा असून तो पाण्यामध्ये डोळ्यांना सुरक्षित ठेवतो.

हे पक्षी मासे खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत, हे पक्षी फांदीवर बसून भक्ष्याची टेहळणी करतात, त्यावर अकस्मात हल्ला करून पकडतात व फांदीवर आपटून खातात. खंडय़ा पक्षी स्थानिक असून आपल्या क्षेत्राचे रक्षण करतात. निवडलेली जागा शीळ घालून मादीला व पिलांना कळवतात व इतर पक्ष्यांना कर्कश ओरडून परतवून लावतात. बहुतांशी खंडय़ा एकटेच आढळतात. प्रजननकाळात मात्र जोडीदाराबरोबर असतात. प्रजातीनुसार खंडय़ा पक्षी आपले घरटे नदीकिनारी, माणसाने बनवलेल्या खड्डय़ात, झाडांच्या पोकळीत, झाडांच्या मुळात बांधतात. यांचे घरटे लांब बोगद्यासारखे असून शेवटी छोटी खोली असते. नर व मादी मिळून घरटे तयार करतात. प्रजातीनुसार यांचा जीवनकाळ 6 – 14 वर्षे असतो.

काळ्या डोक्याचा खंडय़ा
अंदमान, निकोबारसह हिंदुस्थानच्या समुद्र किनाऱयावरील प्रदेशात सर्वत्र आढळतात. बांगलादेश, श्रीलंका, थायलंड आदी देशांतही त्यांचे वास्तव्य असते. पाठीचा रंग गडद निळा असतो. पोटाकडून छातीचा भाग पांढरा व खालील भाग लालसर पिवळा असतो. डोक्यावर मखमली काळी टोपी आणि गळ्यापासून मानेपर्यंत पांढरी पट्टी असते. चोच लाल रंगाची असते.

सामान्य खंडय़ा
यांची पाठ चमकदार निळ्या रंगाची असून पोट व गळ्याचा रंग केशरी असतो. डोक्यावर निळ्या आणि काळ्या रंगाचे नाजूक पट्टे असतात. पाठीवर तसेच कानावर ठिपक्याची नक्षी असते. पाय पोवळ्यासारखे लाल असून चोच काळी तर मागच्या बाजूला काहीशी लाल झालेली असते. हे पक्षी पाणथळीच्या जागी आढळतात.

पांढऱया गळ्याचा खंडय़ा
डोके, मान, छातीचा खालचा भाग तांबूस-पिंगट-तपकिरी रंगाचा तर वरचा भाग चमकदार आकाशी व त्यात हिरव्या रंगाची झाक असते. पंखांचा रंग काळा असून त्यावर पांढऱया रंगांचे पट्टे असतात. हनुवटी, गळा व छाती पांढऱया रंगाची असते. पाय व चोच पोवळ्यासारखी लाल रंगाची असते.

[email protected]