
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील खारफुटीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने ठाण्याच्या इनरव्हील क्लब या संस्थेने पुढाकार घेतला आहे. 1 जुलैपासून या संस्थेने ठाणे आणि मुलुंडमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना रोपे कशी लावायची, त्यांची काळजी कशी घ्यायची याबाबत व्याख्यानांमधून सांगण्यात आले. हा उपक्रम वर्षभर चालणार आहे. खारफुटी वाचवायची असेल तर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापरू नका. त्याची आपल्या घरापासून सुरुवात करा असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
26 जुलैचा महापूर खारफुटी नष्ट झाल्यामुळेच आला होता. भविष्यात असा महापूर पुन्हा येऊ नये आणि मुंबईचे संरक्षण व्हावे यासाठी खारफुटी वाचवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर इनरव्हील क्लब हिल या संस्थेने ठाणे लेक सिटी, ठाणे मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवारी मुलुंड पूर्वेकडील मिठागरांजवळ कांदळवनांमध्ये खारफुटीच्या रोपांची लागवड कशी करायची, त्यांची देखभाल कशी करायची याबाबतची कार्यशाळा सहाय्यक वन संरक्षक अधिकारी सीमा आटगावकर यांनी दिली. यावेळी उपस्थितीत संस्थेच्या सदस्यांनी स्वतः पाण्यात उतरून खारफुटीची रोपे लावली. दरम्यान, विविध शाळांमधील 800 विद्यार्थ्यांसमोर गेल्या महिनाभरात सत्रे घेण्यात आली. त्यात विविध रोपांची लागवड करण्याबरोबर त्यांची काळजी कशी घ्यायची याबाबतचे धडे देण्यात आले. तसेच 150 विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग आणि निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी 30 विजेते घोषित करण्यात आले. त्यांना वन विभागातर्फे प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.





























































