
केंद्र शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांनी नियमानुसार पैसे भरुनही शेतकऱ्यांच्या शेतावर मात्र सोलार कंपनीने सोलार पंप बसविला नाही. अर्धवट काम करून खाजगी सोलार कंपनी फरार झाली असून दुरध्वनीद्वारे संपर्कसाधल्यास आरेरावीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी सोलार कंपनीविरुद्ध लेखी तक्रार केली आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या नावाने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सुरु केलेल्या ‘अटल सौर कृषीपंप योजना-2’ या केंद्र शासनाच्या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कृषीपंप देण्यासाठी गतवर्षी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 31 मार्च 2019 पूर्वी अर्ज भरुन घेण्यात आले. नियमानुसार शेतकऱ्यांकडून या सोलार पंपासाठीचा वाटाही रोख भरुन घेण्यात आला. त्यानंतर जळगाव येथील एका खाजगी सोलार कंपनीला शेतकऱ्यांच्या शेतावर सोलारपंप बसविण्याचे कंत्राट देण्यात आले. या खाजगी कंपनीने तातडीने शेतकऱ्यांच्या शेतावर अर्धवट काम केले. त्यानंतर मात्र जळगावची ही कंपनी एक प्रकारे फरार झाली.
3 एचपीचे सोलार पंप बसविण्याठी शेतकऱ्यांनी वारंवार या कंपनीशी संपर्क साधला. शेतकऱ्यांना प्रारंभी गोडबोलून वेळ मारुन नेण्यासाठी कंपनीने खास बोलघेवडी मानसे ठेवली होती. परंतु शेतकरी सतत पाठपुरवा करत होते. खाजगी सोलार कंपनी मात्र दाद लागू देत नाही. अर्धवट काम करून सहा महिने उलटले आहेत. त्रस्त शेतकरी अखेर परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्याकडे जाऊन आपली कैफीयत मांडली. परंतु उपयोग झाला नाही. शेवटी दुसऱ्यांदा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीला सुद्धा आज दहा दिवस उलटले.
आरेरावीची भाषा
खाजगी कंपनीचा रितेश माळी नावाचा अधिकारी सातत्याने आरेरावीची भाषा करत आहे. शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर आधी फोन उचलतच नाही. उचलला तर कार्यालयीन वेळेत फोन करा, असे सुनावतो. तसेच ‘मी माझ्या पद्धतीने काम करीन, तुम्हाला काय करायचे ते करा…’ अशी उद्धट उत्तरे देतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाविलाज झाला आहे. रब्बी हंगामाच्या पेरण्या चालू आहेत. शेतकऱ्यांना सोलार पंपाची नितांत गरज आहे. वारंवार संपर्कसाधुनही सोलारपंप बसत नाही. जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तेथूनही काम होत नसल्याने शेतकरी वर्गातून निराशा व्यक्त होत आहे.




























































