
आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘पानीपत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून राजस्थानमध्ये मात्र या चित्रपटावरुन हिंसक आंदोलन उसळले आहे. या चित्रपटात राजा सुरजमल यांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप येथील जाट समुदायाने केला आहे.
शहरात लावण्यात आलेले चित्रपटाचे पोस्टर्स आंदोलकांनी फाडले असून ज्या सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला तेथे तोडफोड करण्यात येत आहे. भरतपुर येथे आंदोलकांनी सिनेमागृहाच्या दरवाजावरच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने राजस्थानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्याचे मंत्री विश्वेंद्र सिंग हे राजा सूरजमल यांचे वंशज असून त्यांनी या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
जोधा अकबर, पद्मावती या चित्रपटांप्रमाणेच पानीपतची निर्मिती करणाऱ्यांनी कुठलाही अभ्यास न करता चित्रपट निर्मिती केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पानीपत चित्रपटात मराठ्यांना मदतीच्या मोबदल्यात आमच्या वंशजांनी आग्र्याचा किल्ला मागितल्याचे दाखवण्यात आले आहे. जे सत्य नाही. तर महाराजा सूरजमल यांनी पराक्रमानेच आपला राज्य विस्तार केला होता. असे सिंग यांनी सांगितले आहे. यासाठी सेन्सॉर बोर्ड जबाबदार नसून चित्रपट दिग्दर्शक व निर्माता यांची ही चूक आहे. कुठलेही संशोधन न करता या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. राजा सूरजमल यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी निर्मात्याने त्यांच्या वंशजापैकी एकाही व्यक्तिशी चर्चा केली नसून चुकीचे चित्रण केले आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपटाला प्रसिद्धी मिळण्यासाठीच जाणीवपूर्वक सूरजमल यांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोपही सिंग यांनी केला आहे.
It is unfortunate that the legendary Jat ruler, Maharajah Suraj Mal has been depicted in an unseemly light and historical facts have been distorted in the film, Panipat.
— Vishvendra Singh (@vishvendrabtp) December 8, 2019

























































