
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द सनरायझर्स हैद्राबाद असा सामना रंगला. या लढतीत चेन्नईच्या संघाने दमदार खेळ करत 20 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाला यंदाच्या स्पर्धेत तिसरा विजय मिळवून दिला. मात्र नेहमी मैदानात ‘कॅप्टन कुल’ असणारा एम.एस. धोनी काल भडकला. धोनीने डोळे वटारले आणि पंचांनी आपला निर्णय बदलल्याने सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. हा सर्व प्रकार हैद्राबादच्या डावातील 19 व्या षटकात घडला.
हैद्राबादच्या फलंदाजीदरम्यान चेन्नई कडून 19 वे षटक शार्दूल ठाकूर टाकत होता. याच दरम्यान चेंडू फलंदाजाच्या टप्प्यात येऊ नये म्हणून तो वाईड यॉर्कर टाकत होता. पहिला चेंडू वाईड दिल्यानंतरही शार्दूलने पुन्हा त्याच लाईनमध्ये चेंडू टाकला. पंचांनी पुन्हा वाईड देण्यासाठी दोन्ही हात पसरवले. मात्र यष्टीमागे उभा असलेला धोनी पंचांच्या दिशेने हातवारे करत आणि डोळे वटारत आला. यानंतर पंचांनी आपले हात मागे घेतले. दुसरीकडे फलंदाज आणि डगआउटमध्ये बसलेला हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी मात्र रागाराग केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
https://t.co/YuNL2eLQ6w
Wasn't the umpire looking to signal a wide and then changed his view?#CSKvsSRH #SRHvsCSK #CSK #Yellove #Dhoni #MSDhoni @msdhoni @msdfansofficial— Sridhar_FlashCric (@SridharBhamidi) October 13, 2020
दरम्यान, या लढतीत प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने रायडू 41, वॉटसन 42 यांच्या दमदार खेळीच्या बळावर 20 षटकात 6 बाद 167 धावा केल्या. यानंतर हैद्राबाद संघाला 147 धावांवर रोखत 20 धावांनी विजय मिळवला. आयपीएल 2020 मधील धोनीच्या संघाचा आठव्या लढतीत हा तिसरा विजय आहे.





























































