कोरोनातही भरघोस मतदान, बिहारात पहिल्या टप्प्यात 54 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सुमारे 54 टक्के मतदान झाले आहे. कोरोना संसर्ग असताना मतदानाची ही टक्केवारी 2015 च्या निवडणुकीच्या जवळपास आहे. त्यामुळे हे मतदान भरघोस असल्याचे सांगितले जाते.

कोरोना महामारीच्या काळात होणारी बिहारमधील निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक असे वर्णन निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. त्यामुळे आज पहिल्या टप्प्यातील 71 मतदारसंघातील मतदानाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. सायंकाळी सहापर्यंत 53.54 टक्के मतदान झाले. 2015 ला 54.94 टक्के मतदान झाले होते. अंतिम आकडेवारी आणखी येणे बाकी आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयु आणि भाजपची एनडीए आघाडी व तेजस्वी यादव यांचा राजद-काँग्रेसचे महागठबंधन यांच्यात बिहारमध्ये जोरदार लढत आहे.

असे झाले मतदान

  • निवडणूक आयोगाने कोरोनामुळे पहिल्यांदाच मतदानाचा कालावधी एक तासाने वाढविला. सायंकाळी सहापर्यंत मतदान झाले. n कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाय आयोगाने केले होते. मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आभार मानले आहेत.
  • 80 वर्षावरील वृद्ध आणि दुर्धर आजारग्रस्त मतदारांनी घरून मतदान केले. ही संख्या 50 हजार आहे.
  • 85000 पोस्टल मतदान झाले.
  • पहिल्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यासह आठ मंत्र्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.
  • कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 89 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

3 नोव्हेंबरला दुसरा टप्पा

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा बुधवारी झाला. 3 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्याचे मतदान होईल. दिवाळीआधीच 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील.

पहिल्या टप्प्यातील 71 पैकी 35 मतदारसंघ नक्षलग्रस्त प्रभावी भागातील आहेत. मतदान शांततेत पार पडले. पहिल्या टप्प्यात 2.14 कोटी मतदार होते.