‘क्युआरएसएएम’ क्षेपणास्त्राची ओडिशात यशस्वी चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकाशातील ड्रोनसारख्या वैमानिकविरहित लक्ष्यांना अचूक टिपणाऱया ‘क्यूआरएसएएम’ क्षेपणास्त्राची हिंदुस्थानने शुक्रवारी दुपारी यशस्वी चाचणी केली. या यशस्वी चाचणीनंतर  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, डीडीआर अँड डीचे सचिव आणि डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या.

या चाचणीवेळी  ‘क्यूआरएसएएम’ क्षेपणास्त्रांनी टार्गेट अचूकपणे टिपले. ओडिशाच्या आयटीआर चांदीपूर टेस्टिंग रेंज येथे शुक्रवारी दुपारी 3.50 वाजता या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे आकाशातून होणारे हल्ले रोखण्यास लष्कराला मदत होणार आहे.

‘क्यूआरएसएएम’ क्षेपणास्त्र एका टप्प्याचे घन इंधनावर चालणाऱया  रॉकेट मोटरद्वारे संचालित आहे. या क्षेपणास्त्राच्या सर्व प्रणाली स्वदेशनिर्मित आहेत. बॅटरी मल्टिफंक्शन रडार, बॅटरी सर्व्हेलन्स रडार, बॅटरी कमांड पोस्ट व्हेईकल आणि मोबाईल लाँचर ‘क्यूआरएसएएम’मध्ये वापरण्यात आलेली सर्व उपकरणे देशात तयार करण्यात आली आहेत. आकाशात प्रवास करीत असलेल्या टार्गेटला अचूकपणे टिपण्याची या क्षेपणास्त्रात क्षमता आहे.

‘क्यूआरएसएएम’ क्षेपणास्त्र टार्गेट शोधून त्याच्यावर नजर ठेवू शकते. आणि ते त्याला उद्ध्ववस्त करू शकते. ही प्रणाली लष्कराच्या हल्ला करणाऱया तुकडीला हवाई संरक्षण देण्यासाठी तयार केली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डीआरडीएल, आरसीआय, एलआरडीई, आरअँडडीई (ई), आयआरडीई आणि आयटीआर या प्रयोगशाळांनी या चाचणीत सहभाग घेतला.

‘क्यूआरएसएएम’ क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी आहे आणि यात इलेक्ट्रो मॅकॅनिकल अॅक्च्युएशन (ईएमए) सक्रिय आरएफ स्पीकर ही प्रणाली बसविण्यात आली आहे.