
हिंदुस्थानातील पंजाब नॅशनल बँकेसह अन्य बँकांना 11,300 कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या विरोधात त्याची लहान बहीण पुर्वी मेहता ही साक्ष देणार आहे. पूर्वी आणि तिचा नवरा मयांक मेहता यांनी विशेष न्यायालयाकडे माफीचे साक्षीदार बनण्यासाठी याचिका केली होती. त्यांची ही याचिका न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे आता हे दोघेही नीरव मोदी विरोधात साक्ष देणार आहेत.
पूर्वी ही बेल्जियम नागरिक असून मयांककडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. ‘नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यामुळे आमचे खासगी व व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आम्हाला या प्रकरणात माफीचे साक्षीदार व्हायचे आहे. आमच्याकडे नीरव मोदी व इतर आरोपींविरोधात काही ठोस पुरावे आहेत. ते आम्ही ईडीला देऊ , असे या दोघांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
2018 साली पूर्वी विरोधात इंटरपोलची नोटीस
पूर्वी मेहता हिच्याविरोधात 2018 साली इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटसाठी जारी केली जाते. तिचा पती मयंक मेहता यालाही ईडीने नोटीस बजावलेली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या कर्जघोटाळय़ातून मिळालेल्या 133 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 950 कोटी रुपये) रकमेचा लाभ पूर्वी हिने घेतला आहे. या घोटाळय़ातील पैसा इतरत्र नेण्यात तिचा हात आहे, असा अंमलबजावणी संचालनालयाचा आरोप आहे.
संयुक्त अरब अमिराती (यूएई), ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स आणि सिंगापूर आदी ठिकाणच्या बोगस कंपन्यांत पीएनबी घोटाळय़ाचा पैसा गुंतविण्यात आला आहे. पूर्वी मोदी ही त्या बोगस कंपन्यांची मालक आणि संचालक होती. मुंबईतील ब्रँडी हाऊस येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत झालेल्या कर्ज घोटाळा प्रकरणी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात अंमलबजावणी संचालनालयाने तिचे नाव आरोपींच्या यादीत समाविष्ट केले होते. मॉन्टेक्रिस्टो ट्रस्ट, इथका ट्रस्ट, न्यूझीलंड ट्रस्ट या नावाने काही ट्रस्टमध्ये मोदी हिने पीएनबी घोटाळय़ातील पैसा गुंतविला आहे. बार्बाडोस, मॉरिशस, स्वित्झर्लंड, सिंगापूर, ब्रिटन आणि हॉगकाँग आदी देशांतील बँकांत तिच्या नावावर अनेक खाती आहेत. इंटरपोलच्या नोटीसनुसार तिला इंग्लिश, गुजराती आणि हिंदी भाषा येतात.
नीरव मोदीच्या भावाविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल
नीरव मोदी याचा नातेवाईक असलेल्या नेहल मोदीविरुद्ध 19 कोटी रुपयांच्या हिऱ्यांची अफरातफर केल्याचा गुन्हा अमेरिकेत दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एका डायमंड होलसेल कंपनीकडून 2.6 मिलियन डॉलर (19 कोटी रुपये) हून अधिक किमतीचे हिरे नेहल याने विकत घेतले होते. त्या हिऱ्यांची अफरातफर झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आता नेहलविरुद्ध न्यूयॉर्क कोर्टात खटला चालणार आहे. न्यूयॉर्क राज्याच्या कायद्यान्वये 1 मिलियन डॉलरहून अधिक रकमेची अफरातफर करणं हा फर्स्ट डिग्री गुन्हा मानला जातो. त्याची कमाल शिक्षा 25 वर्षांचा कारावास अशी आहे.



























































