सोनसाखळी चोरीसाठी विमानाने करायचे प्रवास; बंगळुरू पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात बंगळुरू पोलिसांना यश आले आहे. ही टोळी सोनसाखळी चोरी करण्यासाठी दिल्लीहून विमानाने बंगळुरूला जात होते. योजनेप्रमाणे सोनसाखळी चोरी केल्यावर ही टोळी पुन्हा विमानाने दिल्लीला परतत होती. त्यामुळे अनेक दिवस त्यांनी पोलिसांना चकवा दिला. अखेर या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सोनसाखळ्यांची चोरी केल्यावर दिल्लीला परतण्याच्या तयारीत असताना बंगळुरूचे उपपोलीस अधीक्षक सी.के. बाबा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या टोळीताल सहाजणांना अटक केली आहे. सोनसाखळी चोरी केल्यानंतर 48 तासातच पोलिसांनी या टोळीच्या सहा जणांना अटक केली आहे. ते सोनसाखळी चोरी करण्यासाठी दिल्लीहून विमानाने बंगळुरूत येत होते. एखाद्या भागाची रेकी करून सोनसाखळी चोरीची योजना आखत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही टोळी 14 फेब्रुवारीला बंगळुरूत आली होता. शहरातील उत्तर पूर्व भागात चोरी करून 16 फेब्रुवारीला पुन्हा दिल्लीत परतण्याची त्यांची योजना होती. याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी या सर्वांना विमानतळावर रवाना होण्यापूर्वीच अटक केली.

अटक केलेल्यांमध्ये सुरेश कुमार, हसीन खान, इरशाद, सलीम, अफरोज आणि हारिस यांचा समावेश आहे. हारिस केरळचा असून इतर आरोपी दिल्लीचे आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे सी.के. बाबा यांनी सांगितले.

या टोळीतील दोनजण 1 फेब्रुवारीला बंगळुरूत आले होते. त्यांनी शहराबाहेर एक जीप आणि एक व्हिला महिन्याभराच्या भाडेतत्वावर घेतला होता. त्यांनी शहरातील काही भागांची रेकी करून सोनसाखळी चोरीची योजना आखली आणि इतर साथीदारांनाही बोलावले.

योजनेप्रमाणे चोरी झाल्यावर एकजण विमानाने दिल्लीला परतणार होता. तर इतर जण बाईकने दिल्लीला येणार होते. मात्र, ते दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख रुपये किंमतीच्या सोनसाखळ्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या चौकशीतून आणखी काही चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.