
कोकणातून चांगल्या दर्जाचे अभियंते निर्माण करण्यासाठी रत्नागिरीमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून रत्नागिरी येथे 152 कोटी 53 लाख रुपये खर्च करून 300 प्रवेश क्षमतेचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅट्रॉनिक्स इंजिनीयरिंग, सिव्हिल व इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनीयरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स व डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच समकालीन स्पर्धात्मक काळाशी अनुरूप असे अभ्यासक्रम यामध्ये असल्याकारणाने विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांना न्याय देता येईल. विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी जागतिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. विशेषतः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्या भागात सुरू होत असल्याचा कोकणवासीयांमध्ये आनंद निर्माण झाल्याचे उदय सामंत म्हणाले.





























































