लेख – वेब न्यूज- कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर सध्या जगभरात मोठय़ा प्रमाणात केला जात असतो. सध्या वैद्यकीय क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर करून, मानवी आरोग्यासाठी लाभदायक अशी औषधे बनवणे, विविध रोग आणि त्यांचे इलाज शोधणे हे कार्य जगभरात चालू आहे. याच वैद्यकीय क्षेत्रात सध्या दोन कारणांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स प्रचंड चर्चेत आहे.

एक म्हणजे सध्या जगाला ग्रासलेल्या कोरोना महामारीशी लढाईसाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा होत असलेला प्रचंड उपयोग आणि दुसरीकडे चक्क मानवाच्या वर्षभरात येऊ शकणाऱ्या अकाली मृत्यूच्या धोक्याचा शोध घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा होत असलेला उपयोग. एका बाजूला या आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने प्रचंड मोठय़ा आरोग्य डाटाबेसचा अभ्यास करून, इंग्लंडमधील ‘एक्ससेंटेनिया लिमिटेड’ या स्टार्टअपने कोरोना विषाणूच्या गुणसूत्रांचा तपास करून, या कोरोना विषाणूविरुद्ध सध्या उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही औषधापेक्षा पाचपट जास्ती प्रभावी असे औषध निर्माण केल्याचा दावा केला आहे.

या नव्या औषधाच्या क्लिनिकल परीक्षणाचा निकाल 18 ते 24 महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे याच आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने मानवाच्या अकाली मृत्यूचा मागदेखील घेतला जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने एखाद्या रुग्णाची स्टँडर्ड ईसीजी टेस्ट केल्यास, त्याला येणाऱ्या वर्षभरातील संभवित मृत्यूच्या धोक्याबद्दल कल्पना मिळते.

अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया (Pennsylvania) मधील ‘किसिंजर हेल्थ सिस्टिम’च्या संशोधकांनी तब्बल 40,000 रुग्णांच्या 1.77 मिलियन ईसीजी रिपोर्ट्सचा यासाठी अभ्यास केला आहे. यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या ‘न्यूरल नेटवर्क मॉडेल’ची मदत घेण्यात आली. याच्या मदतीने रुग्णाच्या आरोग्याची लहानात लहान समस्यादेखील शोधण्यात यश आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.