
मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र अभयारण्यात मोहाची फुले गोळा करताना त्याची पाने जाळल्याने आग लागली असावी, असे मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा यांनी म्हटले आहे. या आगीने बांधवगडच्या जंगलात मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने ही आग विझवण्यासाठी केंद्राकडे विमानावर आधारित अग्निशमन यंत्रणेची मदत मागितली आहे. बांधवगड व्याघ्र अभयारण्यात वणव्याची घटना काही दिवसांपूर्वी लक्षात आली असून बुधवारी उमरिया जिल्हय़ातील अभयारण्यात लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशातील जैववैविध्यपूर्ण अशा जीवावरणाचा या वणव्याने नाश झाला आहे. बांधवगड अभयारण्याला भेट दिल्यानंतर मंत्री शहा यांनी सांगितले की, सुदैवाने या आगीत मनुष्यहानी झाली नाही व कुठलेही जंगली प्राणी मरण पावले नाहीत.
























































