सिगारेट दिली नाही म्हणून पेट्रोल टाकून घर पेटविले, पुण्यात दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिगारेट दिली नाही या क्षुल्लक कारणावरून टोळक्याने पुण्यातील हांडेवाडी रोड हडपसर येथील चिंतामणी नगर , सय्यदनगर, परिसरात  धुडघूस घातला. त्यानंतर पानटपरी चालकाचा गळा दाबून त्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. टोळक्याने चिंतामणी अमृततुल्य व किराणा दुकानावर दरोडा टाकून गल्ल्यातील रोकड  चोरी केली. त्याशिवाय पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याला मारहाण करून मॅनेजरच्या केबीनमध्ये घुसून तोडफोड करून आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली.

नोमन सय्यद व मोठा पणती उर्फ रिझवान शेख (रा. चिंतामणी नगर हडपसर) यांना वानवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी  सकाळी सात वाजल्यापासून रात्री एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नोमन सय्यद, मोठा पणती उर्फ रिझवान शेख, आत्तु अन्सारी या तिघां विरुद्ध खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, दहशत निर्माण करणे असे गुन्हे वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

आरोपी नोमन व आत्तु यांनी आरिफ यांच्या वडिलांच्या पानटपरीच्या लोखंडी बॉक्सवर दगड मारून शिवीगाळ करत सिगारेटची मागणी केली. परंतू लॉकडाऊनमुळे पानटपरी बंद असल्यामुळे सिगारेट नसल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. त्यावेळी आरोपींनी आरिफच्या वडिलांना शिवीगाळ करत खाली पाडून त्यांचा गळा दाबला. त्यामध्ये ते बेशुद्ध झाले. आरिफ यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान आरिफ हे घराबाहेर थांबले असता, परत आरोपींनी तेथे येऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी कमरेला लावलेला कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. आरिफ हे हॉस्पिटलमध्ये असताना आरोपींनी त्यांच्यावर दहशत रहावी म्हणून पेट्रोल टाकून घर पेटविले.
चिंतामणी अमृततुल्य या चहाच्या दुकानात  सागर राठोड हे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास काम करत होते. त्यावेळी आरोपी नोमन, मोठा पणती व आत्तु या तिघांनी विनामास्क तेथे येऊन पैसे लुबाडण्याच्या उद्देशाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर गल्ल्यातील आठशे रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावली. त्यानंतर  मगर पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

पंपावरील मॅनेजरच्या रुमध्ये घुसून तोडफोड करून मॅनेजर बाळू अंभोरे यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी केवलराम लादुराम परमार यांच्या नवदुर्गा किराणा दुकानात प्रवेश करून त्यांना उलट्या कोयत्याने मारहाण केली. त्यानंतर काउंटरवरील साहित्य रस्त्यावर पाडून नुकसान करून जबदस्तीने गल्यातील तीन हजाराची रोकड चोरी केली. यावेळी दोघा नागरिकांना देखील आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर काही तासांमध्ये दोन्ही आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली.