
परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून राखेची वाहतूक करणारे वाहने उघड्या गाडीतून वाहतूक करत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, याचा नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे, पांगरी मलकापूर नंतर आज कान्हेरवाडी येथील नागरिक रस्त्यावर उतरले त्यांनी अंबाजोगाई परळी रस्त्यावर रस्ता रोको करत दोन तास वाहतूक ठप्प केली.
विद्युत निर्मिती केंद्राच्या फिनिक्स गार्डन मधील हजारो झाडांची कत्तल करून त्याखाली असलेल्या राख रुपी राक्षसाला राख माफियांनी जणू जिवंतच केले आहे.या राखेचा वापर वीट भट्टी यांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो मात्र वाहतूक करताना यावर कुठलेच बंधन नसल्याने या वाहतुकीतुन होणाऱ्या राख प्रदूषणामुळे परळी पासून 100 किलोमीटर परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. परळीतुन जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर या राखेच्या अवैध वाहतुकीमुळे या रस्त्यावरून वाहन चालणेही अवघड होऊन बसले आहे.
गेले काही कित्येक वर्षापासून या राखेच्या वाहतुकीमुळे होणारा त्रासाविरुद्ध परळी परिसरातील नागरिक आता आक्रमक होताना दिसून येत आहेत. कित्येकदा निवेदन देऊन सनदशील मार्गाने आंदोलन करूनही कुठलाच फरक न पडल्याने आता नागरिक थेट या अवैध वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी रस्त्यावर उतलेले दिसून येत आहेत.
नागरिकांनी आता आपल्या गावातून जाणाऱ्या या वाहनांना थेट अडवण्याचे काम सुरू केले आहे. तालुक्यातील पांगरी येथे महिलांनी राखेची वाहतूक करणाऱ्या चालका कडूनच रस्ता साफ करून घेतला इतकेच नाही तर त्यांना धोपटुनही काढले, पुढे मलकापूर येथील गावकऱ्यांनी गुरुवारी रात्री 9 वाजता 25 ते 30 हायवा अडवून ठेवत आपला रोष व्यक्त केला या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.
मर्यादेपेक्षा जास्त राखेची अवैध वाहतूक केल्याने ही राख शहरातील रस्त्यांवर असलेल्या गतिरोधक व खड्ड्यांच्या ठिकाणी सांडली जाते.याकडे वाहतूक करणारे ढुंकूनही पाहत नाहीत. हीच रराख हवेत उडून याचा त्रास नागरिकांना होतो. मंगळवारी सकाळी कन्हेरवाडी येथे गावकऱ्यांनी अवैध राख वाहतूक करणाऱ्या वाह वाहनांना तब्बल दोन तास रोखून धरले होते या वाहनावर कुठलीच कारवाई होत नसल्याने आता परळी तालुक्यातील नागरिक राख प्रदूषणाविरोधात स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत प्रशासनाने कुठलाही अनुचित प्रकार होण्याआधी राख प्रदूषण यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.



























































