
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. घरोघरी नक्षीदार रांगोळी काढून पणत्या अन् तोरणांची आकर्षक सजावट केली जाते. तेल आणि कापसाची वात घालून मातीच्या पारंपरिक पणत्या लावल्या जातात. गेल्या काही वर्षांत विद्युत रोषणाईवर चालणाऱ्या प्लॅस्टिकच्या एलईडी पणत्यादेखील बाजारात आल्या आहेत. मात्र यंदा चर्चा आहे ती सौरऊर्जेवरील पणत्यांची.
आयआयटी मुंबईचे प्रोफेसर चेतन सिंह सोलंकी यांनी चक्क सौर उर्जेवर प्रज्वलित होणाऱ्या पणत्यांची निर्मिती केली आहे. या पणत्यांसाठी तेल, वात किंवा लाइटची आवश्यकता नाही. त्यामुळे सध्याच्या महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांची मोठी आर्थिक बचत होणार आहे. सोलंकी यांनी यासाठी पारंपरिक मातीच्या पणत्यांचा उपयोग केला आहे. सौर ऊर्जेवर चार्जिंग होण्यासाठी या पणत्यांच्या आत एलईडी चीप आणि बॅटरी बसवली आहे, तर पणत्यांचे बाहेरील आवरण प्लॅस्टिकपासून तयार केले आहे. चेतन सिंह यांनी सौर ऊर्जेवरील पणत्या बनवण्याचे प्रशिक्षण देऊन अनेक बेरोजगारांना, महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.



























































