
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये अबुधाबीच्या शेख जायद मैदानात झालेल्या टी-20 लढतीनंतर एक वाईट बातमी आली आहे. या लढतीसाठी खेळपट्टी तयार करणारे हिंदुस्थानचे पिच क्यूरेटर मोहन सिंह यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
हिंदुस्थानच्या दृष्टीने आज अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेला सामना महत्त्वाचा होता. अपगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला असता तर हिंदुस्थानला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी मिळाली असती. मात्र न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केल्याने हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर काही वेळातच पिच क्यूरेटर मोहन सिंह यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा तपास सध्या सुरू आहे.
मोहन सिंह हे हिंदुस्थानचे रहिवासी आहेत. पंजाब क्रिकेट स्टेडियम मोहाली येथे क्यूरेटर बनण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. मोहालीमध्ये त्यांनी बीसीसीआयचे माजी चिफ क्यूरेटर दलजीत सिंह यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर मोहन सिंह सप्टेंबर 2004 मध्ये अबुधाबीला गेले. विश्वचषकासाठी अबुधाबीच्या शेख जायद मैदानावरील खेळपट्टी बनवण्याचे काम त्यांनी केले.
T20 WC कोहलीचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगलं, अफगाणिस्तानच्या पराभवासह हिंदुस्थान स्पर्धेबाहेर
दलजीत सिंह यांची प्रतिक्रिया
माजी चिफ क्यूरेटर दलजीत सिंह यांनी मोहन सिंह यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. मोहन सिंह खूप मेहनती होता आणि मूळचा पंजाबमधील गढवालचा रहिवासी होता, असे दलजीत सिंह यांनी म्हटले. तसेच मोहन सिंह यांच्या अकाली निधनावर दलजीत सिंह यांनी दु:ख व्यक्त केले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.



























































