
मजुरीचे पैसे मागितले म्हणून दलित कामगाराचा हात कापल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या रेवा जिह्यातील डोलमाऊ गावात घडली. याप्रकरणी घरमालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. रेवा जिह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिव कुमार वर्मा यांनी घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. डोलमाऊ गावातील घरमालक गणेश मिश्रा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने मजूर अशोक साकेतचा एक हात धारदार शस्त्राने कापला. मजूर अशोकने आरोपी गणेश मिश्राकडे घर बांधकामाच्या ठिकाणी काम केले होते. त्याने मजुरीसाठी तगादा लावल्यामुळे गणेश मिश्राचा राग अनावर झाला.


























































