दिल्लीत 29 नोव्हेंबरपासून शाळा-कॉलेज सुरू होणार; प्रदूषणाची पातळी घटल्याने सरकारचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी नवी दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शाळा-कॉलेज बंद करण्यात आले होते. आता प्रदूषणाची पातळी कमी झाली असून सरकारने शाळा-कॉलेज पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत 29 नोव्हेंबरपासून शाळा-कॉलेज पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. प्रदूषणाची पातळी घटल्याने दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली वर्क फ्रॉम होमची सुविधाही 29 नोव्हेंबरला संपणार असून त्यांना कार्यालयात यावे लागणार आहे.

प्रदूषणाबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राय यांनी ही माहिती दिली. 29 नोव्हेंबरपासून सरकारी कर्मचाऱ्यांची वर्क फ्ररॉम होमची सुविधा बंद करण्यात येत आहे. तसेच प्रदूषणाची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीतील प्रदूषण कमी होत आहे. सध्या दिवाळीपूर्वी असलेल्या स्थितीत प्रदूषणाची पातळी आली आहे. दरवर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. यावर्षी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शाळा-कॉलेज बंद करण्यात आले होते. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली होती. आता प्रदूषणाची पातळी कमी होत असल्याने शाळा- कॉलेज सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

दिल्लीत प्रदूषण नियंत्रणात राहवे यासाठी 3 डिसेंबरपर्यंत दिल्लीत ट्रकला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, सीएनजी आणि ई वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. शाळा-कॉलेजसह दिल्लीतील सर्व एज्युकेशन इन्स्टीट्यूट्सही सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारल्यानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.