
>> डॉ. मंजिरी भालेराव
प्राचीन हिंदुस्थानात आर्थिक समृद्धी येण्यास परदेशी व्यापारी, परदेशाशी व्यापार या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी होत्या. हे यवन या विशेषणाने ओळखले जाणारे परदेशी व्यापारी ज्या नगरात वस्ती करत होते त्या धेनुकाकट या नगराने प्राचीन हिंदुस्थानी इतिहासाच्या अभ्यासकांना बराच काळ हुलकावणी दिली. या नगराची ओळख पटवण्यासाठी अनेक इतिहासकारांनी सखोल संशोधन केले. विविध प्रकारची कारणमीमांसा देऊन त्यांची मते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण आता डॉ. श्रीकांत प्रधान यांनी अभ्यासानुसार, मुंबईजवळील डहाणू हे पूर्वीचे धेनुकाकट असावे असे मांडलेले मत बऱ्याच अभ्यासकांना मान्य आहे असे दिसते. त्यामुळे तूर्तास तरी यवनांच्या धेनुकाकट या नगरीच्या नावाचे गूढ उलगडले आहे असे म्हणायला हरकत नाही.
प्राचीन हिंदुस्थानामध्ये व्यापाराच्या निमित्ताने अनेक प्रवासी जगातील निरनिराळ्या देशांमधून येत असत. त्यातील काही प्रवासी महाराष्ट्रामध्ये व्यापारासाठी येत होते. सर्वसाधारणपणे हे प्रवासी व्यापाऱ्यांच्या तांड्याबरोबर प्रवास करत असत. पूर्वीच्या काळी लोक एकटे दुकटे फार क्वचितच फिरत असत. अनेकदा विविध प्रकारचे व्यापारी, सामान्य माणसे, भिक्षू आणि भिक्षुणी हे सगळे समूहाने प्रवास करत. त्यामुळे चोर, दरोडेखोर, जंगली श्वापदे यापासून त्यांचे संरक्षण होत असे. या तांड्याबरोबर असणारे भिक्षू प्रवासात आपापल्या या धर्माची तत्त्वे या लोकांना समजावून सांगत असत. बऱयाच लोकांना ही बौद्ध आणि जैन धर्माची मूलतत्त्वे मनाला भावत असत. त्यांना या धर्माला काही मदत करण्याची इच्छा होत असे. अशा वेळेस विविध ठिकाणी तयार होणारे बौद्ध तसेच जैन स्थापत्य याला हे व्यापारी दान देत असत. अनेकदा ही दाने स्थापत्याच्या विविध भागांच्या निर्मितीसाठी दिली जात असत. उदाहरणार्थ दरवाजा, स्तंभ, भिंत, खिडकी, चैत्यगृहाचे मुख इत्यादी. अशा वेळेस त्या ठिकाणाचे नाव, तसेच व्यक्तीचे नाव, शिवाय काय दान दिले आहे, हे सगळे शिलालेखात नोंदवले जात असे.
अशा प्रकारचे अनेक लेख पश्चिम महाराष्ट्रातील शैलगृहात पाहायला मिळतात. यामध्ये जसे हिंदुस्थानी व्यापारी दाने देताना दिसतात तसेच परदेशी व्यापारीसुद्धा दिसतात. या परदेशी व्यापाऱयांमध्ये काही ‘शक’ आणि बऱयाच मोठय़ा संख्येने ‘यवन’ अशी उपाधी घेतलेले दानकर्ते आढळून येतात. ‘शक’ या नावाने प्रसिद्ध असलेले हे परदेशी व्यापारी प्राचीन पर्शिया (म्हणजे आजचे इराण) या देशातील सिथिया या प्रांतातून आले होते, तर ‘यवन’ नावाने प्रसिद्ध असलेले लोक ‘आयोनिया’ या आजच्या तुर्पस्तानच्या जवळच्या म्हणजे पश्चिम आशिया या भागातील होते. त्यांना सम्राट अशोकाच्या काळात ‘योन’ या नावाने ओळखले जायचे. पुढे व्यापाराच्या निमित्ताने ते जेव्हा हिंदुस्थानात आले आणि त्यांनी दाने देऊन त्यांची शिलालेखांच्या स्वरूपात नोंद केली, तेव्हा त्यांनी स्वतःला ‘यवन’ असे म्हणवून घेतले. काळाच्या ओघात हिंदुपुश पर्वताच्या पलीकडून आलेल्या लोकांना ‘यवन’ असे संबोधले जाऊ लागले.
पश्चिम महाराष्ट्रातील शैलगृहांमध्ये अनेक ठिकाणी धेनुकाकटाहून आलेल्या यवन दानकर्त्यांचे लेख आहेत. यामध्ये कान्हेरी, शेलारवाडी, पितळखोरा आणि सर्वात जास्त लेख कार्ले येथे आढळतात. कार्ले येथील चैत्यगृहात 15 लेख हे यवन दानकर्त्यांचे आहेत. खालीलप्रमाणे लेख आढळतात. उदा. ‘धेनुकाकट गंधिकस सिंहदतस दानं घरमुघ’ म्हणजे ‘धेनुकाकट येथील गंधिक (सुगंधी द्रव्यांचा व्यापारी) सिंहदत्त याने (शैल) गृहाच्या दारांची दिलेली देणगी, ‘धेनुकाकटा धंमयवनस’ म्हणजे धेनुकाकटाच्या धर्म (नावाच्या) यवनाचा (स्तंभ), ‘धेनुकाकटा यवनस यसवधनानं थभो दानं’ म्हणजे धेनुकाकटाच्या यवन यसवधन (यशवर्धन) याने हा स्तंभ दिला इ. स्वरूपाचे लेख ब्राह्मी लिपी आणि प्रापृत भाषेत लिहिलेले आढळतात. बऱयाच लेखांमध्ये या यवनांची नावे हिंदुस्थानी आहेत. एक शक्यता अशी वर्तवता येते की, ही त्यांची हिंदुस्थानातील दुसरी पिढी असावी. त्यामुळे त्यांची नावे हिंदुस्थानी आहेत.
वरील लेख पाहिल्यावर असे दिसते की, बरेच यवन हे धेनुकाकट नावाच्या गावाहून आलेले होते. या गावाचे शिलालेखीय उल्लेख कार्ले या ठिकाणी असलेल्या या चैत्यगृहात खूप मोठय़ा संख्येने आढळतात. हे गाव पुठे असेल याबद्दल अनेक लोकांनी अनेक प्रकारची मते प्रदर्शित केलेली होती. आंध्र प्रदेशमध्ये अमरावती हे महास्तुपाचे ठिकाण धरणी कोटा नावाच्या गावाजवळ आहे. सुरुवातीला अनेक तज्ञांनी धरणी कोटा या स्थळाचे जुने नाव धान्य कटक म्हणजेच या शिलालेखातील धेनुकाकट आहे असे मत मांडले, परंतु धेनुकाकट या ठिकाणाहून आलेल्या दानकर्त्यांचे लेख पश्चिम महाराष्ट्रातच मोठय़ा संख्येने आढळतात. त्यावरून हे ठिकाण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असावे असे इतर काही अभ्यासकांचे म्हणणे पडले. डॉ. सुरेश वसंत जाधव तसेच डॉ. हरिहर ठोसर यांनी धेनुकाकट म्हणजे जुन्नर असे एक मत मांडले. जुन्नर या स्थळाचे खरे नाव आपल्याला, मला माहीत नाही. एक जुने नगर या अर्थाने आलेले जुन्नीनगर किंवा जीर्णनगर हे नाव असलेल्या जुन्नरचे मूळ नाव धेनुकाकट असावे अशा प्रकारचे मत वरील आणि इतर काही तज्ञांनी व्यक्त केलेले आहे. प्रख्यात संशोधक दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी असे मत मांडले की, कार्ले या ठिकाणी एवढय़ा मोठय़ा संख्येने धेनुकाकटाहून आलेल्या यवनांचे लेख आहेत तर हे गाव कार्ल्याच्या जवळ असले पाहिजे. म्हणून त्यांनी देवघर या कार्ल्याच्या जवळच्या गावाचे तत्कालीन नाव धेनुकाकट असावे असे मत मांडले, पण अनेक इतिहास अभ्यासकांना हे मत मान्य नाही असे पुढे लक्षात आले.
ही एवढी सगळी मते मांडली गेली असताना ते नेमके पुठे आहे किंवा होते याबद्दल तज्ञांचे एकमत झालेले नाही. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागातील डॉ. श्रीकांत प्रधान यांनी असे मत मांडले की, मुंबईजवळील डहाणू हे पूर्वीचे धेनुकाकट असावे. यवनांचे वसतिस्थान म्हणजे हे एक व्यापारी पेंद्र असणार हे उघडच आहे. तसेच ‘धेनुकाकट’ म्हणजे धेनुका म्हणजेच दहाणुका नदीच्या काठावरचे गाव, असा या गावाच्या नावाचा अर्थ होऊ शकतो. तसेच डहाणू गावात अशी मौखिक परंपरा आहे की, जुने डहाणू पाण्यात गेले आहे आणि नवीन डहाणू सध्याचे शहर आहे. समुदाला जेव्हा ओहोटी असते तेव्हा काही वेळेस जुन्या वस्तीचे अवशेष दिसतात. समुद्री मार्गाने व्यापार करणाऱया त्या प्राचीन काळातील व्यापाऱयांनी त्यांची वस्ती समुद्रापासून जवळच असणाऱ्या नगरात केली असणे अशक्य नाही. या सर्व कारणांमुळे डहाणू हेच मूळचे धेनुकाकट असावे असे एक महत्त्वाचे मत डॉ. श्रीकांत प्रधान यांनी मांडले आहे.
प्राचीन हिंदुस्थानात आर्थिक समृद्धी येण्यास परदेशी व्यापारी, परदेशाशी व्यापार या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी होत्या. हे यवन या विशेषणाने ओळखले जाणारे परदेशी व्यापारी ज्या नगरात वस्ती करत होते त्या धेनुकाकट या नगराने प्राचीन हिंदुस्थानी इतिहासाच्या अभ्यासकांना बराच काळ हुलकावणी दिली. या नगराची ओळख पटवण्यासाठी अनेक इतिहासकारांनी सखोल संशोधन केले. विविध प्रकारची कारणमीमांसा देऊन त्यांची मते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण आता डॉ. श्रीकांत प्रधान यांनी मांडलेले मत बऱयाच अभ्यासकांना मान्य आहे असे दिसते. त्यामुळे तूर्तास तरी यवनांच्या धेनुकाकट या नगरीच्या नावाचे गूढ उलगडले आहे असे म्हणायला हरकत नाही.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत.)
[email protected]




























































