
‘बेटी बचाव, बेटी पढाव’ तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ठाण्यातील बाळकुम येथील दहा वर्षीय सई पाटील या चिमुकलीने पुढाकार घेतला आहे. कश्मीर ते कन्याकुमारी हे तब्बल चार हजार किमीचे अंतर ती सायकलवरून दीड महिन्यामध्ये पार करणार आहे. विशेष म्हणजे, या प्रवासादरम्यान प्रत्येक गावातील शाळांमधून सई जनजागृती करणार आहे.
बाळकुम येथे राहणारी सई पाटील ही ‘जलपरी’ म्हणूनदेखील ओळखली जाते. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती जलतरण आणि सायकलिंग करते. आजवर तिने जलतरण आणि सायकलिंगमध्ये अनेक पदकांची लयलूट केली आहे.
कश्मीर ते कन्याकुमारी या तिच्या सायकल प्रवासाला 16 डिसेंबरला कटरा येथून सुरुवात होणार आहे. वडील आशीष पाटील यांची साथ तिला या मोहिमेदरम्यान असणार आहे. नुकतीच या प्रवासासाठी ती कटरा येथे रवाना झाली आहे. कटरा, जम्मू, उधमपूर, गुरुदासपूर, अमृतसर, बिकानेर, जोधपूर, पालमपूर, वलसाड, वापी, ठाणे, पनवेल, पुणे, कोल्हापूर, म्हैसूर, मदुराई ते कन्याकुमारी असा तिचा प्रवास असणार आहे.
जलतरण आणि सायकलिंगचा आपला छंद जोपासण्यासोबत समाजप्रबोधन करण्यावर तिचा भर असतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, महाराष्ट्र दिन अशा विशेष दिवशी ती सायकल प्रवास करत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करते. वयाच्या आठव्या वर्षी लोणावळा ते बाळकुम हे 120 किमीचे अंतर तिने सायकलवरून फक्त सहा तासांत पार केले होते. हा तिचा सुरुवातीचा सर्वात मोठा प्रवास होता.
बेटी बचाव, पर्यावरण संवर्धन तसेच लोकांना सायकल प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सई ही कश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास करणार आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत ती प्रवास करणार असून चार हजार किमीचे दीड महिन्यात गाठण्याचे आमचे लक्ष्य आहे.
आशीष पाटील, सईचे कडील

































































