
नवनव्या शहरात, निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करायला प्रत्येकालाच आवडते. कुटुंबीय किंवा मित्रमंडळीव्यतिरिक्त सोलो ट्रिप म्हणजे एकटय़ाने भ्रमंती करण्याची अनेकांची इच्छा असते. सोलो ट्रिप मजेशीर असली तरी तितकीच आव्हानात्मकसुद्धा असते, खासकरून महिलावर्गासाठी. महिलांची हीच समस्या दूर करत त्यांना सुरक्षितरीत्या आणि कमी पैशांत देशभरात सफर घडविण्याचे काम इंदौरची साक्षी बालदे ही तरुणी करत आहे. तिने आपल्या पॅशनला प्रोफेशन बनवत ‘लेट हर ट्रव्हल’ नावाचा अनोखा स्टार्टअप सुरू केला आहे.
इंदौर येथे राहणाऱया साक्षीने मेडी कॅप्स युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग पूर्ण केले आहे. इंजिनीअरिंगच्या दुसऱया वर्षात शिक्षण घेत असताना तिच्या ग्रुपमधील मैत्रिणींनी सहलीचा प्लॅन केला. त्यांचा हा प्लॅन रद्द झाला, कारण काही मैत्रिणींच्या पालकांनी पैशांचे तर काहींच्या पालकांनी सुरक्षिततेचे कारण पुढे केले. मात्र, साक्षीने सोलो ट्रिप यशस्वीरीत्या पूर्ण केली. आजही देशभरात महिलांनी एकटे फिरणे सुरक्षित मानले जात नाही. त्यांना कुटुंबीयांसह समाजाच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. पूर्वापार चालत आलेल्या विचारसरणीला छेद देत महिलांना सुरक्षितरित्या जगाची सफर घडवण्याची आयडिया साक्षीला सुचली.
साक्षीने ऑनलाईन आणि प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन सर्व्हे केला. प्रवासादरम्यान महिलांना कोणत्या समस्या येतात त्याचा अभ्यास केला. त्यानंतर तिने महिलांसाठी सुरक्षित आणि पॉकेट फ्रेंडली लेट हर ट्रव्हल नावाचा स्टार्टअप सुरू केला. 2018 ला तिने 15 मुलींसोबत इंदौर ते मांडू ही पहिली ट्रिप आयोजित केली. आजवर तिने मध्यप्रदेश, गोवा, मनाली, जयपूर अशा ठिकाणी 45 हून ट्रिप महिलांसाठी आयोजित केल्या आहेत. आपल्या स्टार्टअपद्वारे तिने 15 मुलींना रोजगार दिला आहे.


























































