
कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेला कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने अखेर परवानगी दिली असून तब्बल ७०० दिवसांनी फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. फुटबॉलच्या इतिहासात ही पहिलीच घटना असावी असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने. 4 ते 15 मार्च 2020 या कालावधीत भव्य प्रमाणात महापौर चषक फुटबॉल स्पर्धचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सर्व सामने खेळविण्यात आले होते. परंतु देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या बंदी आदेशामुळे महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत एक उपांत्य सामना आणि अंतिम सामना 13 मार्च 2020 रोजी पासून स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 700 दिवसांनी पुन्हा स्पर्धा खेळवली जाणार आहे. .
स्थगित केलेले सामने घ्यावेत अशी मागणी माजी नगरसेवक आणि फुटबॉल खेळाडू सचिन पाटील यांच्यासह 16 संघांनी केली होती. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनालाही निवेदन दिले होते. जगभरात सर्व क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा सुरू झाल्या.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या असतानाही कोल्हापूरातील फुटबॉल हंगाम मात्र बंद होता. त्यामुळे खेळाडू, संघ, फुटबॉल शौकिनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याच पार्श्वभूमीवर स्थगित झालेली फुटबॉल स्पर्धा सुरू होत असल्याने फुटबॉल शौकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.






























































