
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांचे घोडे कितीही उधळू द्या, आम्हीच जिंकणार आहोत, असा सणसणीत टोला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. ‘राज्यसभेचा उमेदवार जिंकण्यासाठी आवश्यक मते आमच्याकडे आहेत. त्यामुळे राज्यसभेचे सहावे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार हे राज्यसभेत जातील,’ असा ठाम विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जे विरोधात उभे राहत आहेत त्यांना विरोध केला जात आहे. पेंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी टाकल्या जात आहेत. दिल्लीतील ‘आप’चे नेते सत्येंद्र जैन हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेची तयारी करीत होते. भाजपला त्यांचे आव्हान वाटत होते म्हणून त्यांना तुरुंगात पाठवले. महाराष्ट्रात आगामी राज्यसभा, विधान परिषद निवडणुका जिंकण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. राज्यसभा निवडणुकीवरून काँग्रेसअंतर्गत नाराजीवर ते म्हणाले, ‘काँग्रेसचा हा अंतर्गत विषय आहे. देशाचे राजकारण पाहता काँग्रेसने चाणाक्ष आणि सावधगिरीने पावले टाकायला हवी होती. काँग्रेसला सगळय़ांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना देशी खेळात पटाईत
‘बुद्धिबळाच्या चालींप्रमाणेच राजकारणातील चाली असतात. विजयी होऊनदेखील ग्रॅण्डमास्टरला हरावे लागले हे 2019 ला उभ्या महाराष्ट्राने पाहिले,’ असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. संजय राऊत म्हणाले, ‘आमच्याकडेही पट आहेत. शिवसेना तर देशी खेळात पटाईत आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सर्व खेळ आमच्याकडे आहेत,’ असा पलटवार त्यांनी फडणवीसांवर केला.


























































