मुसेवालावर गोळय़ा झाडणारे दोन शूटर पुण्यातील; पुण्यापाठोपाठ पंजाब पोलीसही मागावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर गोळय़ा झाडणारे दोन शूटर पुण्यातील असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

मुसेवाला याची 29 मे रोजी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. ज्या आठ जणांनी गोळय़ा झाडल्या त्यापैकी दोघे पुण्यातील असून संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी त्यांची नावे आहेत. आठ शूटरपैकी तिघे पंजाबचे, तीन राजस्थानचे आणि दोघे महाराष्ट्राचे होते असे पंजाब पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

आंबेगाव तालुक्यातील पोखरी गाकाचा सराईत गुन्हेगार संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाळ हे दोघेही सध्या फरार आहेत. मंचरचा ओमकार ऊर्फ रानिया बाणखेले याच्या खूनप्रकरणात संतोष जाधव वॉण्टेड आहे. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा त्याच्या शोधात आहे. घोडेगाव पोलिसांनी त्याला लुकआउट नोटीस बजावली होती. न्यायालयात 6 जून 2022 तारीख होती. मात्र, तो हाती लागला नाही, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

सीसीटीव्ही तपासले

मुसेवाला हत्या प्रकरणाचा तपास करताना काही सीसीटीव्ही फुटेज पंजाब पोलिसांच्या हाती लागले होते. तपासादरम्यान आठ शूटर्सची ओळख पटली. मात्र त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पंजाब पोलिसांनी ही सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांना पाठविले. त्यानंतरच संतोष जाधव आणि सौरव महाकाळ यांचा या हत्या प्रकरणातील सहभाग उघड झाला.