मुंबईत 99 टक्के रुग्ण ओमायक्राॅनचे , 202 नमुन्यांपैकी 201 ओमायक्राॅन, एक डेल्टाचा रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात असला, तरी कोरोनाच्या ओमायक्राॅन विषाणूचा संसर्ग कमी झाला नसल्याचे 12 व्या जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालातून स्पष्ट झाले. अहवालात चाचणी केलेल्या मुंबईतील 202 नमुन्यांपैकी 201 जणांना ओमायक्राॅन तर एकाला डेल्टा झाल्याचे उघड झाले आहे. मुंबईत 99.5 टक्के रुग्ण ओमायक्राॅनचे असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. 12व्या जिनोम अहवालात एकूण 279 रुग्णांचे नमुने तपासले गेले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेकडून कोरोना झालेल्या रुग्णांचे विभागवार जिनोम सिक्वेंसिग चाचण्या करण्यात येत आहेत. महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेतून ऑगस्ट 2021 पासून नियमितपणे व फेरीनिहाय जिनोम सिक्वेंसिंग केले जाते. महापालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 12 वा जिनोम सिक्वेसिंग अहवाल तयार करण्यात आला.

 तरुणांना सर्वात जास्त संसर्ग

12 व्या जिनोम सिक्वेंसिंग अहवालानुसार कोरोनाच्या ओमायक्राॅनचा तरुणांना सर्वात जास्त संसर्ग झाला आहे. 202 रुग्णांपैकी 44 टक्के अर्थात 88 रुग्ण हे 21 ते 40 या वयोगटातील आहेत तर 41 ते 60 या वयोगटात देखील 26 टक्के म्हणजेच 52 एवढेच रुग्ण आहेत. 16 टक्के म्हणजेच 32 रुग्ण हे 61 ते 80 या वयोगटातील आहेत. 12 टक्के म्हणजेच 24 रुग्ण हे 20 वयोगटातील तर 2 टक्के म्हणजे 5 रुग्ण हे 81 ते 100 या वयोगटातील आहेत.

 मुंबईनंतर आता ठाण्यात बीए- 5 व्हेरिएंटचा शिरकाव 

मुंबईसह राज्यात कोरोना नियंत्रणात येत असताना कोरोनाचा अतिजलद संसर्ग करणार्या बीए-4 आणि बीए-5 व्हेरिएंटने सोमवारी मुंबईत शिरकाव केल्यानंतर आज ठाण्यात बीए-5 व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडल्यामुळे मुंबईनंतर आता ठाणेकरांची चिंता वाढली आहे. राज्यात आतापर्यंत बीए-4 आणि बीए-5 च्या रुग्णांची एकूण संख्या 14 वर पोहोचली आहे. आज पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार, ठाण्यात बीए-5 व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. यातील एक 25 वर्षांची महिला असून दुसरा रुग्ण हा 32 वर्षांचा पुरुष आहे. या दोघांना 28 आणि 30 मे रोजी कोरोना झाला होता. मात्र, होम क्वारेंटाईन झाल्यानंतर हे दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत. या दोघांचेही पूर्ण लसीकरण झालेले आहे. या आधी पुण्यात बीए 4 व्हेरिएंटचे 4 तर बीए 5 व्हेरिएंटचे 4 रुग्ण सापडले होते तर मुंबईत सोमवारी बीए-4 व्हेरिएंटचे 3 आणि बीए-5 चा एक रुग्ण सापडला होता.

 राज्यापेक्षा मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या अधिक  

मुंबईत सोमवारी 700 ने कमी झालेला कोरोना रुग्णांचा आकडा आज पुन्हा वाढला असून आज दिवसभरात 1 हजार 724 रुग्ण सापडले तर दोघांचा दुर्दैवाने मृ्त्यू झाला. मृ्त्यूमुखी पडलेल्या दोन्ही महिला असून त्यांचे वय 60 पेक्षा जास्त होते. रुग्ण दुपटीचा दर कमी होऊन 458 दिवसांवर आला आहे. कोरोनामुक्त होणार्यांची संख्या वाढली असून आज दिवसभरात 1 हजार 240 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, सक्रीय रुग्णांची संख्या 19 हजार 575 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यातही रुग्णसंख्या वाढली असून आज दिवसभरात 2 हजार 956 रुग्ण सापडले तर चार जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 2 हजार 165 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 267 वर पोहोचली आहे.