
गेल्या नोव्हेंबर महिन्यात वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथून बेपत्ता झालेली 22 वर्षीय एमबीबीएसची विद्यार्थीनी स्वदिच्छा साने या तरुणीचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलिसांकडून तिला शोधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. स्वदिच्छाने त्या रात्री मित्तू सिंग या लाईफ गार्ड सोबत सेल्फी घेतली होती. त्यामुळे तपासाचा भाग म्हणून मित्तूची नार्को टेस्ट करण्यात येणार असल्याचे समजते.
बोईसरला राहणारी स्वदिच्छा 29 नोव्हेंबरच्या सकाळी कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण ती कॉलेजला गेलीच नाही. वांद्रे स्थानकात उतरल्यानंतर ती रिक्षाने वांद्रे बॅण्डस्टॅण्डला गेली. रात्री उशिरा ती समुद्र परिसरात एकटीच असल्याचे पाहून लाईफ गार्ड मित्तू सिंग तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. स्वदिच्छाने मित्तूसोबत सेल्फी काढला. दोघांनी त्यावेळी गप्पा देखील मारल्या होत्या. पण मध्यरात्रीनंतर ती कुठे गेली याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. मित्तूची आता नार्को टेस्ट केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.


























































