
देशातील अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हिमाचल प्रदेशमध्येही गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहेत. मात्र कुल्लूमध्ये आभाळच फाटले असून सततच्या कोसळधारांमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून अनेक सरकारी प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे. मणिकर्ण येथील टूरिस्ट कॅम्पचेही पावसामुळे नुकसान झाले आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुल्लूमध्ये बुधवारी आभाळ फाटल्याने मणिकर्ण खोऱ्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहून अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी आणि एनडीआरएफची पथके बचावासाठी तैनात करण्यात आली आहेत.
कुल्लूचे एसपी गुरदेव शर्मा यांनी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारांमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. आतापर्यंत 6 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच सात घरांचेही नुकासान झाल्याचे शर्मा यांनी सांगितले. पावसाच्या जोरामुळे 3 सरकारी प्रकल्पांनाही नुकसान झाले आहे. तसेच पावसाचा जोर वाढतच चालल्याने धरणातूनही पाणी सोडता येत नाहीय. मात्र नागरिकांना नदी किनाऱ्यापासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Himachal Pradesh: Flash flood hits Manikaran valley of Kullu district due to heavy rainfall, dozens of houses and camping sites damaged in Choj village: SP Kullu Gurdev Sharma pic.twitter.com/NQhq8o8JXC
— ANI (@ANI) July 6, 2022
पावसामुळे मणिकर्णमध्ये हाहाकार उडाला आहे. अनेक टूरिस्ट कॅम्प आणि घरांचे नुकसान झाले आहे. वाढता धोका पाहून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागामध्ये पाऊस सुरू असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महिलेचा मृत्यू
दरम्यान, शिमलामध्ये भूस्खलन होऊन एका मजूर महिलेचा मृत्यू झाला, तर काही बेपत्ता आहेत. ढल्ली येथे झालेल्या या भूस्खलनामध्ये एक पुरुष आणि एक महिला जखमीही झाली. हे सर्व रस्त्याच्या कडेला तंबू ठोकून राहत होते. जखमींना इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.





























































