
मुंबईसह राज्यात सुरू असलेला पाऊस मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही जोरदार बरसत असल्यामुळे सहा दिवसांतच दोन महिन्यांचा पाणीसाठा जमा झाला आहे. सद्यस्थितीत सात तलावांत मिळून 2 लाख 32 हजार 744 दशलक्ष लिटर पाणी जमा आहे. मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा पाहता हे पाणी दोन महिन्यांना पुरणारे आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यातील 27 टक्के पाणी गळतीमध्ये वाया जात असल्याने काही भागात पाणीपुरवठय़ावर परिणाम होते. यातच गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास जुलै उजाडत असल्याने तलावांतील पाणीसाठा तळ गाठतो. या वर्षीही हीच स्थिती राहिल्याने पालिकेने मुंबईत 27 जून 2022 पासून 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र संपूर्ण जून महिना दडी मारलेल्या पावसाने आठवडाभरापासून जोरदार बरसायला सुरुवात मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने 1 ऑक्टोबर रोजी सातही तलावात मिळून 14,47,363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठय़ाची आवश्यकता असते.
6 जुलै रोजीचा पाणीसाठा
मोडक सागर 51087 दशलक्ष लिटर
तानसा 20658 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा 22106 दशलक्ष लिटर
भातसा 125004 दशलक्ष लिटर
विहार 9794 दशलक्ष लिटर
तुळशी 4094 दशक्षल लिटर
असा वाढला जलसाठा
1 जुलै 157773 द. लि. 40 दिवस
2 जुलै 170520 द. लि. 44 दिवस
3 जुलै 186973 द. लि. 48 दिवस
4 जुलै 193310 द. लि. 50 दिवस
5 जुलै 214169 द. लि. 55 दिवस
6 जुलै 232744 द. लि. 60 दिवस































































