आयर्लंड पहिल्यांदाच विश्वचषकाच्या मुख्य फेरीत; वेस्ट इंडीज बाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोनदा जगज्जेता ठरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघावर टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत बाद होण्याची नामुष्की आली. पात्रता फेरीच्या आज झालेल्या अखेरच्या सामन्यात आयर्लंडने त्यांचा 15 चेंडू आणि 9 विकेट्सनी पराभव करीत विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीत आपले स्थान निश्चित केले. आठ संघांमध्ये झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यातून ‘अ’ गटातून श्रीलंका आणि नेदरलॅण्ड तर ‘ब’ गटातून आयर्लंड आणि झिम्बाब्वे सुपर-12 मध्ये पोहोचले आहेत.

 विंडीजवर पहिल्यांदाच नामुष्की

बेलेरिव्ह ओव्हलवर झालेल्या सामन्यात निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या विंडीज संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. वेस्ट इंडीज संघाने 2012 साली पहिल्यांदा टी-20 चे जगज्जेतेपद पटकावताना श्रीलंकेचा पराभव केला होता तर 2016 साली इंग्लंडला हरवून त्यांनी या यशाची पुनरावृत्ती केली होती. मात्र आज त्यांच्या फलंदाजांसह गोलंदाजांनीही अत्यंत वाईट खेळ केला. विश्वचषकाच्या सुपर 12मध्ये प्रवेश करणारा 12वा संघ त्यांचा असेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण त्यांच्या खेळाडूंनी घोर निराशा केली. त्यामुळे टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच विंडीज संघावर पात्रता फेरीत बाद होण्याचे दुर्दैव ओढावले.

विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांच्या फलंदाजांनी अपेक्षित फलंदाजी केली नाही. एकटय़ा ब्रॅण्डन किंगच्या 62 धावांच्या नाबाद खेळीमुळे त्यांचा संघ 20 षटकांत 5 बाद 146 धावांपर्यंत मजल मारू शकला. आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीने 16 धावांत 3 हादरे दिल्यामुळे विंडीज दीडशेच्या पलीकडे पोहोचू शकला नाही आणि 147 धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या गोलंदाजांना फोडून काढताना पॉल स्टर्लिंग आणि ऍण्डी बलबर्नीने 7 षटकांत 73 धावांची सलामी दिली. आयर्लंडच्या धडाकेबाज प्रारंभानंतरच त्यांचा विजय निश्चित झाला होता. त्यानंतर स्टर्लिंगने लॉर्कन टकरच्या साथीने 77 धावांची अभेद्य भागी रचत आपल्या विजयासह सुपर 12 प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. स्टर्लिंगने 66 धावा ठोकल्या तर टकरने 45 धावांची जोरदार खेळी केली. 2009 च्या टी-20 विश्वचषकानंतर पहिल्यांदाच आयर्लंडचा संघ मुख्य फेरीत खेळणार आहे. गेल्या पाचही विश्वचषकात त्यांचा संघ पात्रता फेरीतच बाद झाला होता. 2009 साली मात्र 12 संघांच्या स्पर्धेत ते खेळले होते. त्यावेळी त्यांचा संघ गटातच बाद झाला होता.