
दिवाळीनिमित्त गोरेगाव परिसरातील रस्ते, वाहतूक बेटे आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिकठिकाणी केलेल्या रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे गोरेगावच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. ही विद्युत रोषणाई आपल्या मोबाईल कॅमेऱयात पैद करण्यासाठी वाहतूक बेटाच्या परिसरात नागरिक गर्दी करत आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने यंदा मुंबई महानगरपालिकेने घरोघरी तिरंगा अभियान राबवताना संपूर्ण मुंबई शहर तिरंगा विद्युत रोषणाईने झळाळून निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने दिवाळी सणाच्या निमित्ताने आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, वाहतूक बेटं इत्यादींवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गोरेगावकरांची दिवाळी प्रकाशमय करण्यासाठी परिमंडळ-4 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वामी विवेकानंद रस्ता, पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच लिंक रोड आणि काही वाहतूक बेटे अतिरिक्त रोषणाई करून उजळवली आहेत. त्यामुळे पालिकेचे कौतुक केले जात आहे.




























































