पुणे – 17 वर्षीय मुलीवर वडील आणि काकांचा बलात्कार, आजोबांकडून लैंगिक छळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील एका 17 वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी आणि काकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या मुलीचा तिच्या आजोबांनी देखील लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही पुण्यातील धानोरी भागात राहत असून या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीचे वडील अजय (वय 49), काका विजय (वय 33) आणि आजोबा रामेश्वर (वय 70) या तिघांविरोधात विश्रांतवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीने अलीकडेच पुण्यातील तिच्या कॉलेजमध्ये झालेल्या समुपदेशन कार्यक्रमात विशाखा समितीच्या सदस्यांसमोर ही घटना सांगितली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 ते 2018 या कालावधीत पीडित मुलगी उत्तर प्रदेश येथील महुआरकला, चंदोली येथे तिच्या मूळगावी गेली होती. यावेळी तिच्या वडिलांनी आणि काकाने तिच्यावर सतत बलात्कार केला तर तिच्या आजोबांनी देखील तिचा लैंगिक छळ केला.

एप्रिल 2018 मध्ये, पुण्यात परतल्यानंतर, मुलीने तिच्या वडिलांना पत्र लिहून उत्तर प्रदेशात तिच्यासोबत घडलेल्या घटनांची माहिती दिली. यावेळी अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी, वडिलांनी 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत तिची आई घरी नसताना तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिच्या 49 वर्षीय वडिलांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारदार युवतीचे कुटुंबीय मूळचे उत्तरप्रदेशातील आहे. युवती एका महाविद्यालयात बारावीत विज्ञान शाखेत आहे. हुशार विद्यार्थिनी म्हणून ती महाविद्यालयात ओळखली जाते. युवतीच्या आई-वडील पुण्यात मजुरी करतात. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने युवतीला 2016 मध्ये उत्तरप्रदेशात शिक्षणासाठी पाठविले होते. त्या वेळी युवतीचे वय 12 वर्ष होते. त्या वेळी तिच्या काकाने तिच्यावर अत्याचार केले. आजोबांनी अश्लील चाळे केले. त्यानंतर 2018 मध्ये ती पुन्हा पुण्यात राहणाऱ्या आई-वडिलांकडे आली.

तिने याबाबतची माहिती वडिलांना दिली. आई कामाला बाहेर पडल्यानंतर वडिलांनी तिच्याशी अश्लील कृत्य केले. महाविद्यालयात झालेल्या समुपदेशन कार्यक्रमात युवतीने व्यथा मांडली. काका, आजोबा, वडिलांनी अत्याचार केल्याचे तिने समुपदेशकांना सांगितले. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तिच्या वडिलांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करत आहेत.