FIFA World Cup हिंदुस्थानलाही मिळाले होते तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉल हा क्रीडाविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळ होय. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळणे हे प्रत्येक देशाचे स्वप्न असते. यावेळी सहा आशियाई देश फिफाच्या या सर्वोच्च महोत्सवात खेळणार आहेत, पण या स्पर्धेसाठी पात्र ठरणे ही सध्या तरी हिंदुस्थानच्या आवाक्यातील गोष्ट वाटत नाही. मात्र एकदा हिंदुस्थानने चक्क एकदा फुटबॉल वर्ल्ड कपचे तिकीट बुक केले होते; पण दुर्दैवाने त्यावेळी हिंदुस्थानने फिफाच्या या शिखर स्पर्धेतून माघार घेतली होती.

हिंदुस्थानी संघाने 1950 मध्ये ब्राझीलमधील फिफा वर्ल्ड कपची पात्रता मिळविली होती. त्यावेळी हिंदुस्थानसह फिलिपिन्स, इंडोनेशिया व बर्मा (म्यानमार) या आशियाई देशांना फिफाने वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले होते, मात्र फिलिपिन्स, इंडोनेशिया व बर्मा या तिन्ही देशांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने हिंदुस्थानी संघाला वर्ल्ड कपचे तिकीट मिळाले होते. या स्पर्धेत हिंदुस्थानला स्वीडन, इटली व पराग्वे या संघांसोबत ठेवण्यात आले होते, पण त्यानंतर हिंदुस्थाननेही माघार घेतली.

कारण गुलदस्त्यात!

16 मे 1950 रोजी फिफा वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी फुटबॉल संघाची घोषणा झाली होती. 15 जूनला हिंदुस्थानी संघ ब्राझीलला रवाना होणार होता. 25 जूनला हिंदुस्थान पराग्वे संघाविरुद्धच्या लढतीने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करून इतिहास घडविणार होता. मात्र कुठे माशी शिंकली हे कळायला मार्ग नाही; पण हिंदुस्थानची ब्राझीलवारी रद्द करण्यात आली. का रद्द करण्यात आली याबाबतचे अधिकृत कारण आजपर्यंत गुलदस्त्यातच आहे, हे विशेष.

न खेळण्याच्या कारणांबद्दल स्पष्टता नाही!

1950 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तिकीट बुक करूनही हिंदुस्थानी संघ का सहभागी झाला नाही, याबाबतचे स्पष्ट कारण आजपर्यंत समजलेले नाही.  50 च्या दशकात हिंदुस्थानी फुटबॉलपटू अनवाणी पायाने खेळायचे, मात्र स्पर्धेत अनवाणी खेळण्यास परवानगी नाकारल्याने हिंदुस्थानला त्यावेळी फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सहभागी होता आले नाही, असे बोलले जाते. याचबरोबर संघनिवडीतील मतभेद आणि सरावासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने वर्ल्ड कपसाठी संघ पाठविण्यास नकार दिला, असेही एक कारण सांगितले जाते. शिवाय आर्थिक कारणामुळे त्यावेळी हिंदुस्थानी संघ फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ शकला नाही, असेही कारण सांगितले जाते.

उद्घाटन सोहळय़ात हिंदुस्थानी मॉडेलचा नृत्याविष्कार

हिंदुस्थानी अभिनेत्री व मॉडेल नोरा फतेही फिफा वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळय़ात आपली आदाकारी पेश करणार आहे. नृत्याविष्काराने उपस्थित प्रेक्षकांना घायाळ करण्यासाठी व आपल्या तालावर नाचविण्यासाठी नोरा सज्ज झाली आहे. हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता उद्घाटन सोहळय़ाला प्रारंभ होईल. याचबरोबर दक्षिण कोरियन बॅण्ड, नायजेरियन संगीतकार व गायक पॅट्रिक नॅमेका ओकोरी व यंदाच्या वर्ल्ड कपसाठी अधिकृत गीत बनविणारा अमेरिकन रॅपर लिल बेबी यांच्याही कला उद्घाटन सोहळय़ात सादर होणार आहेत.