
>> निरुपमा महाजन
साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो आणि बालसाहित्य हा भविष्यातील समाज घडवणारा पाया असतो. बालसाहित्य हे पुढच्या पिढय़ांना संस्कारक्षम व मानसिकदृष्टया सुदृढ बनवण्याचे काम करते. योग्यवेळी योग्य मूल्यांची गुटी देण्याचे काम करते. साहाजिकच बालसाहित्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री संजीवनी बोकील यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला ‘फुले आणि परीराणी’ हा बालकथासंग्रह खऱया अर्थाने सर्वांगसुंदर आहे. संजीवनी बोकील यांनी कथा, कविता, कादंबरी, एकांकिका, लोकगीते, दीर्घकाव्य, ललित, बालसाहित्य, मराठी व हिंदी व्याकरणावरील पुस्तके असे विपुल लिखाण केले आहे. स्वतः एक सक्षम शिक्षिका असल्याने मुलांच्या मानसिकतेची त्यांना पुरेपूर जाण आहे. म्हणूनच त्यांच्या निरागस, संवेदनशील मानसिकतेशी त्यांना सहज एकरूप होता आले आहे. बालमनावर चांगले संस्कार करू शकेल, त्यांच्या विचारांना योग्य दिशा देऊ शकेल या दृष्टीने ‘फुले आणि परीराणी’ हा कथासंग्रह मला फार महत्त्वाचा वाटला. निसर्गाबद्दल मुलांना असलेले कुतूहल आणि जवळीक यांचा लेखिकेने कल्पकतेने उपयोग करून घेतला आहे.
दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘फुले आणि परीराणी’ हे सुंदर पुस्तक श्री. सरदार जाधव यांच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे लक्षवेधक ठरते. पुस्तक हातात घेताक्षणी कागदाचा दर्जा, सुखावह स्पर्श व मुलांच्या हाताळण्याच्या दृष्टीने टिकाऊपणा या गोष्टी अतिशय समाधानकारक वाटतात. संपूर्ण पुस्तकात गोष्टींना समर्पक अशी उत्तमोत्तम चित्रे व नावीन्यपूर्ण रंगसंगती साधल्याने या पुस्तकाचे वाचन हा लहानथोरांसाठी सर्वार्थांने मनोहर अनुभव ठरतो. ‘नव्या आशेने फुलणाऱया प्रत्येक बालकास’ समर्पित केलेल्या या पुस्तकाला डॉ. सुरेश सावंत यांची सुरेख प्रस्तावना लाभलेली आहे. मनोगतातून लेखिका संजीवनीताई बोकील यांनी मांडलेले विचार व मलपृष्ठावरील मा. शोभा भागवत यांची प्रतिक्रिया अत्यंत वाचनीय आहे.
या कथासंग्रहात एकूण सहा कथा आहेत. संवाद ओघवते व नेमके आहेत. पात्रवर्णने व निसर्गवर्णने चित्रदर्शी तरीही आटोपशीर आहेत. या कथांना योग्य वेग आहे, त्यामुळे कोणतीही कथा कुठेच रटाळ वाटत नाही. बालसाहित्यात हे अतिशय महत्त्वाचे असते. या कथांची उत्पंठा वाढवणारी लेखनशैली वाचकाला शेवटपर्यंत बांधून तर ठेवतेच, पण मानवी स्वभावाचे अनेक पंगोरे मुलांसमोर उघडून ठेवते. त्यातील योग्य वा अयोग्य काय, हेही कथेतूनच मुलांना आपसूक उमगते आणि एकेक सुंदर संस्कार मुलांच्या मनावर हलकेच कोरला जातो.
संग्रहातील शेवटची कथा तर केवळ अप्रतिम! इतर कथांमधून मुलांना निसर्गाची ओळख होते, तर शेवटच्या कथेत निसर्गातून आपल्याला काय शिकवण घेता येते, हे अगदी खुबीने मुलांना सांगितले आहे. आपली वृत्ती जिज्ञासू व चिंतनशील कशी असावी, हेही कळून येते.
सुरेख छपाई, शुद्ध भाषा, अचूक व्याकरण, दैनंदिन जीवनातील सुबोध बोली व खुमासदार संवाद यामुळे मराठी व इंग्रजी माध्यमातील मुलांनाही हे पुस्तक नक्कीच आवडेल, मराठी भाषेचे चांगले धडेही मिळतील, यात शंका नाही.
एकदा हातात घेतल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय पुस्तक हातातून खाली ठेवावेसे वाटत नाही. सर्व वयोगटातील मुलांनी वाचावे, पाहावे व अनुभवावे, पालकांनी लहान मुलांना वाचून दाखवावे असे हे संस्कारक्षम, मनोरंजक अशा गोड गोष्टींचे रंगीत पुस्तक आवर्जून विकत घ्यावे, लहान मुलांना भेट द्यावे असेच झाले आहे.
फुले आणि परीराणी
लेखिका : संजीवनी बोकील
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
पृष्ठे : 32, मूल्य : रुपये 120/-



























































