
21 फेब्रुवारीपासून बारावी, तर 2 मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा काळात येणाऱया समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी 383 समुपदेशकांची फौज राज्यभर तैनात करण्यात आली आहे. या समुपदेशकांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेअंतर्गत (एससीईआरटी) सेवांतर्गत समुपदेशन प्रशिक्षण पूर्ण केले असून समुपदेशनाची सोय परीक्षापूर्व, परीक्षा कालावधीत व परीक्षेनंतर तसेच परीक्षेच्या निकालानंतरही उपलब्ध राहणार आहे.
राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत हे समुपदेशक काम करणार आहेत. एससीईआरटीच्या वेबसाईटवर या समुपदेशकांचे संपर्क क्रमांक जारी करण्यात येणार असून निकालापर्यंत विद्यार्थ्यांना येणाऱया विविध अडचणी, समस्यांवर समुपदेशक मार्गदर्शन करणार आहेत. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी आणि परीक्षेनंतर असे दोन प्रकारे मार्गदर्शन करण्यात येईल. परीक्षेपूर्वी विद्यार्थी अभ्यास कसा करावा, तणाव कसा दूर करावा, आहारविषयक समस्या, परीक्षेची भीती, हॉल तिकीट हरवले, मार्ंकग पद्धत याविषयी प्रश्न विचारतात. या प्रश्नांवर उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या शंकांचे पूरेपूर निरसन करण्याच्या सूचना समुपदेशकांना देण्यात आल्या आहेत.
दहावी, बारावीच्या परीक्षा आणि निकालानंतर करीअरविषयक मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना कसोटीविरहित सल्ला द्यावा, अशा सूचना समुपदेशकांना देण्यात आल्या आहेत. नववी, दहावी, बारावीचे गुण लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांचे छंद, आवडीनुसार त्यांना विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली जाणार आहे. तसेच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, दहावीनंतरचे इतर अभ्यासक्रम, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
समुपदेशकांना परीक्षेच्या कामातून वगळा
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणाऱया शिक्षकांना बोर्डाच्या परीक्षेच्या कामकाजातून वगळण्यात यावे, अशा मागणीचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक काwस्तुभ दिवेगावकर यांनी राज्य शिक्षण मंडळाला पाठविले आहे. समुपदेशकांना परीक्षाविषयक कामकाज देण्यात आल्यास विद्यार्थ्यांच्या समुपदेशनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णवेळ मार्गदर्शन करणे सोयीचे व्हावे यासाठी समुपदेशकांना परीक्षेचे काम देऊ नये, अशी मागणी एससीईआरटीने केली आहे.


























































