
शिवसेनाप्रणित दि स्टॉक एक्सचेंज एम्प्लॉईज युनियन आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या (बीएसई लिमिटेड) व्यवस्थापनामध्ये झालेल्या पगारवाढीच्या करारामुळे 125 कर्मचाऱयांना बेसिक पगारात 29 टक्के पगारवाढ मिळाली आहे. पगारवाढीबरोबरच कर्मचाऱयांना 2013 पासूनची 18 कोटींची थकबाकीही मिळणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱयांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे.
स्टॉक एक्सचेंज एम्प्लॉईज युनियनने कायदेशीर मार्गाचा वापर करून 2015 पासून पगारवाढीसाठी औद्योगिक न्यायालयात लढाई सुरू केली. मात्र, काही कारणांमुळे पगारवाढीचा प्रश्न लांबला होता. अशावेळी दि स्टॉक एक्सचेंज एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष- खासदार विनायक राऊत आणि अध्यक्ष संजय सिंघवी यांनी न्यायालयीन लढाई टेबल चर्चा करून सोडवण्यास कंपनीच्या प्रशासनाला भाग पाडले. बीएसई लिमिटेड आणि दि स्टॉक एक्सचेंज एम्प्लॉईज युनियन मुंबई यांच्यात खासदार विनायक राऊत यांनी ऐतिहासिक पगारवाढ करार केला. पगारवाढीचा करार करताना संघटनेच्या वतीने अध्यक्ष संजय सिंघवी, सरचिटणीस प्रमोद ढावरे, माजी नगरसेविका मिनल जुवाटकर तर व्यवस्थापनाच्या वतीने मुख्य जोखीम अधिकारी कमला के., मुख्य वित्त अधिकारी नयन मेहता, मुख्य नियामक अधिकारी नीरज कुलक्षेष्ठा, वरिष्ठ वकील लॅन्सी डिसुझा आदी उपस्थित होते.






























































