
ढोल-ताशाच्या गजरात मालवण किनारपट्टीवर महाज्योतीच्या प्रज्वलनाने गुरुवारी सायंकाळी गाबीत महोत्सवाचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. मालवण शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यानंतर मोरयाचा धोंडा येथे श्री गणेशाचे पूजन करण्यात आले. दांडी किनारपट्टीवर पारंपरिक वेशभूषा केलेल्या शेकडो गाबीत स्त्री-पुरुषांच्या उपस्थितीत शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.
अखिल भारतीय गाबित समाज महासंघ मुंबई व गाबित समाज महाराष्ट्र आणि गाबित सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण दांडी किनारपट्टीवर गाबित महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अखिल भारतीय गाबित समाज महासंघ, मुंबईचे अध्यक्ष परशुराम उपरकर, गाबीत समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, गाबीत समाज सिंधुदुर्ग अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, सुदेश आचरेकर, सौरभ ताम्हणकर, रुपेश प्रभू, दिगंबर गांवकर, संजय बांदेकर, अशोक तोडणकर, प्रवीण सरवणकर, प्रविणा सरवणकर, पूजा सरकारे, अन्वय प्रभू, संमेश परब, नरेश हुले, लक्ष्मीकांत खोबरेकर, जितेंद्र शिर्सेकर यांसह अन्य उपस्थित होते.
गुरुवारी सायंकाळी मामा वरेरकर नाट्यगृह येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर शहरातून गाबित ध्वज घेऊन बाईक रॅली काढण्यात आली. शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गाबित समाजाचा शिमगोत्सव कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. महोत्सवाच्या निमित्ताने दांडी किनारपट्टीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, 30 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.





























































