सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उद्या (दि. 28) मतदान होत आहे. 18 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. मिरज, कवठे महांकाळ आणि जत तालुक्यातील चोवीस केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना असून, या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे.

बाजार समितीची निवडणूक अडीच वर्षे लांबणीवर पडली होती. तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली बाजार समितीला राजकीयदृष्टय़ा विशेष महत्त्व आहे. बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मागील आठ दिवस आरोप-प्रत्यारोपानंतर उद्या (शुक्रवारी) मतदान होत आहे. शनिवारी (दि. 23) रोजी मिरजेत मतमोजणी होणार आहे. बँकेसाठी 8 हजार 675 मतदार आहेत. तीन तालुक्यांत 24 ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. सांगली शहरात 8 मतदान केंद्रे, मिरज शहरात 4 केंद्रे आहेत. कवठे महांकाळमध्ये 5, तर जतमध्ये 7 मतदान केंद्रे आहेत. बाजार समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरील तयारीही पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. मतदानासाठी 150 कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. गुरुवारी दुपारी मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी केंद्रांवर रवाना झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीसही तैनात ठेवले आहेत.