पुणे जिल्हय़ात महाविकास आघाडीला घवघवीत यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश संपादन केले. पुरंदरमध्ये मिंधे गटाचा धुव्वा उडाला. बारामतीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविली.

नीरा बाजार समितीत महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलला 18 पैकी 2 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. मतदान झालेल्या सर्व 16 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. मिंधे गटाचे माजीमंत्री विजय शिवतारे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रयत पॅनलने एकहाती विजय मिळविला. भाजप-मिंधे गटाचा दारूण पराभव झाला.

मंचर बाजार समितीत 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीच्या भीमाशंकर पॅनलने विजय मिळविला.

भोरमध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय मिळविला. भाजपला भोपळाही पह्डता आला नाही.

दौंड बाजार समितीत राष्ट्रवादी नऊ आणि भाजपने नऊ जागांवर विजय मिळविला.

खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.

पुणे बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनेलचाच झेंडा
पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत आण्णासाहेब मगर सहकार पॅनेल आणि सर्वपक्षीय आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने एकमेकांसमोर होते. सहकार पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले, तर शेतकरी विकास आघाडीच्या सर्वपक्षीय पॅनेलचे नेतृत्व पुणे जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे यांनी केले. निवडणुकीमध्ये दोन्ही पॅनेल ताकदीने एकमेकासमोर उभे ठाकले होते. यामध्ये पक्षविरोधी भुमिका घेतल्याबद्दल विकास दांगट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टीची घोषणा गारटकर यांनी केली होती. असे असूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय पॅनेलच्याच पारडय़ात मतदारांनी विजयाचे मताधिक्य टाकल्याने बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनेलचाच झेंडा फडकला आहे.

बुलढाण्यात मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना जोरदार धक्का
बुलढाणा बाजार समितीत मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना महाविकास आघाडीने पराभवाची धुळ चारत जोरदार धक्का दिला. बुलढाणा जिह्यातल्या 10 पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर हाती आलेल्या निकालात जिह्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. 5 पैकी 3 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. बुलढाण्यात महाविकास आघाडीला 12 तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपला 6 जागा मिळाल्या.