‘वंदे भारत’चा वायूवेग कागदावरच! रेल्वे ट्रॅकची क्षमता नसल्याने वेगावर मर्यादा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील पहिली ‘सेमी हायस्पीड ट्रेन’ अशी ओळख असणाऱ्या वंदे भारतचा वाऱ्याचा वेग कागदावरच असल्याचे समोर आले आहे. वंदे भारतची ताशी तब्बल 180 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे, मात्र सध्या देशभरात असलेल्या रेल्वे ट्रकची क्षमता त्या तुलनेने कमी आहे. तसेच इतर इफ्रास्ट्रक्चरही त्या तोडीचे नाही. त्यामुळे वंदे भारत ट्रेन क्षमतेपेक्षा कमी म्हणजेच सरासरी ताशी 90-95 किलोमीटर वेगाने चालवली जात असल्याने वंदे भारत इतर सुपरफास्ट ट्रेनच्या पंक्तीत येऊन बसली आहे.

वंदे भारत ही अत्याधुनिक ट्रेन असून सध्या देशभरात 14 मार्गांवर धावत आहे. ही गाडी वेगाने धावावी म्हणून प्रत्येक दोन डब्यासाठी तब्बल 450 हॉर्स पॉवरच्या (अश्वशक्ती) इलेक्ट्रिक मोटार लावल्या आहेत. वंदे भारत ट्रेन तांत्रिकदृष्टय़ा वाऱ्याच्या वेगाने धावण्यास सक्षम असली तरी सध्याचे रेल्वेचे ट्रक पाहता ती जास्तीत जास्त ताशी 120 किलोमीटर वेगाने चालवली जात आहे. मात्र गाडीचा सरासरी वेग जास्तीत जास्त 95 किलोमीटर असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, रेल्वेचे ट्रक आणि इफ्रास्ट्रक्चर वंदे भारतच्या तोडीचे नसल्याने कोणत्या भागात किती वेगाने गाडी चालवावी याचा चार्टच लोको पायलटच्या हातात दिला जात आहे. त्यामुळे क्षमता असूनही वंदे भारत निर्धारित वेगाने चालवावी लागत आहे.

महाराष्ट्रात धावणाऱ्या दोन्ही गाड्यांचा वेग सर्वात कमी
रेल्वेकडून देशभरात 14 मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी आणि सोलापूर या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत गाडय़ांचा सरासरी वेग अनुक्रमे 66 आणि 71 एवढा कमी आहे. या दोन्ही गाडय़ा घाटमार्गावर चालवण्यात येत असल्यानेच त्यांचा वेग मर्यादित आहे.

वंदे भारत ट्रेनचा सरासरी ताशी वेग
नवी दिल्ली-वाराणसी …… 96 किमी
हजरत निजामुद्दीन-राणी कमलापती….. 95.89 किमी
चेन्नई-कोईमतूर……. 90.36 किमी
नवी दिल्ली-अम्बा अंदाऊरा …… 85 किमी
सिकंदराबाद-विशाखापट्टणम….. 84 किमी
गांधीनगर-मुंबई सेंट्रल ….. 83.87 किमी
अजमेर-दिल्ली….. 83 किमी
नवी दिल्ली-श्री माता वैष्णोदेवी कटरा…. 82 किमी
सिकंदराबाद-तिरुपती …. 79 किमी
नागपूर-बिलासपूर …. 78 किमी
हावडा-न्यू जलपायगुडी …. 76.84 किमी