
या देशात राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार हा तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांना आहे. झिरवळ यांनी त्यावेळी घेतलेला निर्णय नवीन अध्यक्ष बदलू शकत नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. मिंधे गटाच्या 16 गद्दार आमदारांच्या पात्रतेविषयी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्हाला असं वाटतं की या देशात कायदा, संविधान आहे. या देशात राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद सर्वोच्च न्यायालयात आहे, असं आम्हाला आजही वाटतंय, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याबाबत आम्ही आशावादी आहोत. तुम्ही आधी राजीनामा द्या आणि ज्यांनी हा अपात्रतेचा निर्णय दिलेला आहे, त्यांना निर्णय घेऊ द्या. त्यामुळे पात्र-अपात्रतेचा निर्णयाचा अधिकार हा तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांना आहे. हे त्यांना मान्य आहे का? ते स्वतः कायदे पंडित आहेत. झिरवळ यांनी घेतलेला निर्णय नवीन अध्यक्ष आल्यावर फिरवू शकत नाही. त्यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांनी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. वारंवार आरोप करायचे आणि यंत्रणांनी आमच्यावर कारवाया करायच्या. मी सुद्धा वाट पाहतोय. अजून बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. या राज्याची आर्थिक गुन्हे शाखा हे ज्या पद्धतीने काम करताहेत, ईडी-सीबीआयवर आमचं बारीक लक्ष आहे, त्यांनी एक लक्षात ठेवावं की सरकार बदलणार आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.
बुधवारी होणाऱ्या कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर कडाडून टीका केली. राऊत म्हणाले की, कर्नाटक हे दक्षिणेतलं महत्त्वाचं राज्य आहे. आणि दक्षिणेतलं एकमेव राज्य जे भाजपकडे होतं किंवा आहे. ते राहणार नाही. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, देशभरातले राज्यातले नेते, मुख्यमंत्री यांनी नेहमीप्रमाणे कर्नाटकात ठाण मांडलं. पैशांचा महापूर उसळला. यंत्रणा वापरली. अगदी बजरंगबलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालीसा वगैरे. पण यांना कोणताही देव पावणार नाही आणि बजरंगबलीच यांच्या डोक्यात पराभवाची गदा मारणार आहे. 13 तारखेला पाहा काय होतं. बजरंग बली गदा यांच्या डोक्यात पडणार आहे. तिकडे मणिपूरला काय चाललंय, कश्मीरमध्ये पूंछला 5 सैनिक मारले गेले. सीमेवरती अक्षरशः आग लागली आहे. आणि आमचे पंतप्रधान आणि गृहमंत्री कर्नाटकात प्रचारामध्ये व्यग्र राहतात. मणिपूर पेटलंय. तुमच्या हातातून मणिपूर गेलं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही निवडणूक प्रचाराचा रोड शो करता? पण, कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव होताना दिसत आहे, असं राऊत म्हणाले.
राज्यातील सत्ताधारी मिंधे गटावरही त्यांनी तोफ डागली. राऊत म्हणाले की, आम्हाला फक्त दुःख याच गोष्टीचं आहे की, कर्नाटकचा निकाल लागायचा तो लागेल. शिवसेनेची भूमिका ही सीमाप्रश्नाविषयी अत्यंत तीव्र आहे. गेल्या 65 वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. आतापर्यंत शिवसैनिक म्हणवून घेणारे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय, असं सांगणारा कुणीही माई का लाल हा बेळगावसह सीमाभागात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी प्रयत्न करत नव्हता. यावेळी प्रथमच असं झालं. गेल्या सात वर्षांत देवेंद्र फडणवीस आणि आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागात मराठी बांधवांचा, एकीकरण समितीचा पराभव व्हावा म्हणून शर्थ केली, ताकद लावली. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या टोळीने तर कोट्यवधी रुपये बेळगावात एकिकरण समितीचा पराभव करण्यासाठी पाठवले आहेत. हे पाप आहे. मेंगलोरला यांचे काही लोक उतरले आणि तिथून पैसे पाठवले. या देशात, कर्नाटकात असं कधी घडलं नव्हतं. कर्नाटक निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर होत आहे. सीमाभागात इतक्या मोठ्या प्रमाणात जो पैशांचा वापर झाला हा महाराष्ट्रातली खोके संस्कृती तिकडे नेण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो, असं राऊत यावेळी म्हणाले.
































































