
जालन्यातील अंतरवाली सराटी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरुद्ध रणशिंगं फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मात्र, 40 व्या दिवशी आम्ही सरकारला सोडणार नाही; असा थेटच इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
आंतरवाली सराटी गावात साखळी उपोषण करत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्याच्या दौर्यावर जाण्याअगोदर आज 26 सप्टेंबर रोजी पत्रकाराशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, ‘कायदेशीर लढाई म्हणून आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अजिबात होणार नाही. 83 क्रमांकावर, 2004 जीआर ही कायदेशीर होता, गायकवाड कमिशनचा अहवाल कायदेशीर होता. राणे समितीचा अहवाल ही कायदेशीर होते, कायद्यानेही मागास आयोग सिद्ध केला. कायद्यात राहून कायद्याचा अभ्यास करु, कोर्टात जावू, असे म्हणतात परंतु कायद्याने मराठा समाजाला प्रत्येक वेळेस हुलकावणी देत गेले आहे. आता आम्हाला वेठीस धरू नका. तसेच 65 लाख अभिलेखांपैकी 5 हजार कुणबी नोंदी सापडल्या असतील तर, आरक्षण देण्यासाठी त्या अभिलेखांचे पुरावे भरपूर झाले आहेत. सरकारला फक्त पुरावे आधार लागत होता. आरक्षण देण्यासाठी संत मंहताने पुरावे दिले. तसेच आता सरकारला पुरावे सापडलेत. आरक्षण देण्यासाठी ते पुष्कळ पुरावे आहे. आम्ही वेळही दिलाय. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचे ते आता सरकारने ठरवलं पाहिजे. पण 40 व्या दिवशी आम्हाला आरक्षण लागू झाले पाहिजे. बाकीची कारणं सांगू नयेत. नाहीतर आम्ही सरकारला सोडणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
”खरं तर समिती स्थापन नका करू असं सांगूनही सरकारने आमचे ऐकले नाही. आता आमच्यावेळी कायदेशीर अडचणी कशा येतात? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी विचारला. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीररित्या येथे येऊन गेलेत. आम्ही सरकारकडून वेळ घेतला नाही, सरकारनेच आमच्याकडून वेळ मागून घेतला आहे. आता मराठ्यांच कोणतं नुकसान व्हायचं राहिलय? मराठ्यांच सगळं वाटोळं झालंय. आम्हाला शांततेत आंदोलन करायच आहे. पण यासोबतच आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणार्या मनोज जरांगे यांची मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन 30 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. दरम्यान, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला मराठा समाजाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर, सर्व पक्षांनी मराठा समाजाच्या गोरगरीब पोरांच्या पाठीमागे राहावं, मराठा समाजाने सर्व पक्षाना सुखात ठेवण्यासाठी 70 वर्ष मदत केली. त्यामुळे याचा विरोध करून पापाचे धनी होऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.





























































