ज्युनियर मेहमूद काळाच्या पडद्याआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नईम सय्यद ऊर्फ ज्युनियर मेहमूद (67) यांचे गुरुवारी मध्यरात्री वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना पोटाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. अखेर कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी लता आणि दोन मुले आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी जुहू कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला.

ज्युनियर मेहमूद यांचा मुलगा हसनैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अठरा दिवसांपूर्वी वडिलांना पोटाच्या कॅन्सरचे निदान झाले. आता त्यांच्या आयुष्यातील केवळ काही दिवस शिल्लक आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना रुग्णालयात ठेवणे योग्य होणार नाही, असे टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली.’ दरम्यान, ज्युनियर मेहमूद यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी जॉनी लिव्हर, रझा मुराद, सुनील पाल, राकेश बेदी, सुदेश भोसले, शैलेश लोढा, सचिन पिळगावकर, अली असगर आदी कलाकार उपस्थित होते.

7 भाषांमध्ये 265 सिनेमे
ज्युनियर मेहमूद यांनी 50 वर्षांच्या करीअरमध्ये सात भाषांमधील 265 हून अधिक सिनेमांत भूमिका साकारल्या. त्यांनी ‘नौनिहाल’, ‘मोहब्बत जिंदगी है’, ‘संघर्ष’, ‘ब्रह्मचारी’, ‘फरिश्ता’, ‘हाथी पतंग’, ‘अंजाना’, ‘दो रास्ते’, ‘यादगार’, ‘आन मिलो सजना’, ‘जोहर मेहमूद इन हाँगकाँग’, ‘कारवां’, ‘हाथी मेरे साथी’, ‘छोटी बहू’, ‘चिंगारी’, ‘हरे राम गाता हरे’, ‘हरे राम गाता चल’, ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तसेच ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘तेनाली रामा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. ‘अदलाबदली’ आणि ‘अर्धा गोंद्या अर्धा गंगू’ या मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केले होते.

सर्वात महागडे बालकलाकार
बॉलीवूडच्या इतिहासात अनेक बालकलाकार होऊन गेले, परंतु जेवढं प्रेम आणि प्रसिद्धी ज्युनियर मेहमूद यांच्या वाटय़ाला आली, तेवढी कदाचितच कोणत्या बालकलाकाराच्या वाटय़ाला आली असेल. ज्युनियर मेहमूद हे त्या काळातील सर्वात महागडे बालकलाकार होते. एका दिवसासाठी त्यांना तब्बल तीन हजार रुपये मानधन मिळायचे. इम्पाला या अत्यंत महागडय़ा कारमधून ते सेटवर पोहोचायचे.

असे पडले ज्युनियर मेहमूद नाव
बालकलाकार नईमने ‘सुहाग की रात’ चित्रपटात मेहमूद यांच्यासोबत काम केले. एकदा मेहमूद यांनी मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी सर्वांना बोलावले, पण लहानग्या नईमला बोलावले नाही. नईम त्यांना म्हणाला, ‘‘मी तुमच्या पार्टीत आलो तर पार्टीला चार चाँद लागतील. मी तुमच्या ‘हम काले है तो…’ गाण्यावर परफॉर्मन्स करेन’’. त्याचा परफॉर्मन्स पाहून मेहमूद त्याचे फॅन झाले आणि त्यांनी नईमला आपला शिष्य बनवत त्याचे नामकरण ‘ज्युनियर मेहमूद’ असे केले.