पंड्याचे पुनरागमन लांबणीवर; अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे संघातील पुनरागमन लाबंणीवर पडले आहे. वर्ल्ड कपदरम्यान घोटय़ाच्या दुखापतीतून तो सावरलेला नसल्यामुळे अफगाणविरुद्धच्याटी-20 क्रिकेट मालिकेलाही मुकण्याची दाट शक्यता आहे. मात्र आयपीएलपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वनडे वर्ल्डकपदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चेंडू अडवताना त्याच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे केवळ चार सामने खेळणारा हार्दिक पंडय़ा उर्वरित वर्ल्ड कपला मुकला होता. तेव्हापासून हार्दिक पंडय़ा एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकल्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱयावरदेखील जाता आले नाही.

वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 आणि वन डे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे पंडय़ाच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला हिंदुस्थानच्या टी-20 संघाचे कर्णधार बनविण्यात आले होते. याचबरोबर वन डेमध्ये के. एल. राहुलकडे संघाची धुरा सोपविण्यात आली होती.

टी-20 संघाचा कर्णधार कोण?
टीम इंडिया आयसीसी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध शेवटची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 11 ते 17 जानेवारीदरम्यान हिंदुस्थानात होणार आहे. पंडय़ाच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते, मात्र आता सूर्यकुमारदेखील जायबंदी झाल्याने हिंदुस्थानी संघाची धुरा कोण सांभाळणार? हे बघावे लागेल.