
आपल्यापेक्षा सरस गुणांकन असलेल्या वरिष्ठ बुद्धिबळपटूंना मागे टाकत 15 वर्षीय अथर्व सोनीने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आयोजित 25 व्या रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. स्पर्धेत अव्वल स्थान पटकावताना अथर्वने सात फेऱ्यांमध्ये साडेसहा गुणांची कमाई करत बाजी मारली. अनिरुद्ध पोतवाड आणि ऋषी कदम अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.
सहाव्या फेरीअखेर विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली होती. साडेपाच गुण असलेल्या अथर्वने सातव्या फेरीत फिडे मास्टर अनिरुद्ध पोतवाडला मात देत विजयासह आपले वर्चस्व राखले. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी चौघांमध्ये चढाओढ होती. सहा गुणांसह बरोबरीत असलेल्या अनिरुद्ध आणि ऋषीने जास्त गुणांकनाची नोंद करत इतरांना मागे टाकले. वडील सत्यभान सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळाचे धडे गिरवत आहे. अथर्व बदलापूर येथील एअरसन इंग्लिश स्कूलमध्ये नवव्या इयत्तेत शिकत आहे.