
हरयाणातील ट्रव्हल ब्लॉगर आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या ज्योती मल्होत्रा हिला देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ती ‘ट्रव्हल विथ-जो’ नावाचे यूटय़ूब चॅनल चालवते. या प्रकरणात आतापर्यंत पंजाब आणि हरयाणाच्या वेगवेगळ्या भागातून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ज्योती पाकिस्तान भेटीदरम्यान देशाच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या एजंटांशी संपर्कात होती.
ज्योती मल्होत्रा 2023 मध्ये पाकिस्तानला गेली होती. या काळात तिची भेट पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. दानिशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंटांशी झाली. त्यांचे नाव ज्योतीच्या पह्नमध्ये ‘जट्ट रंधावा’ असे सेव्ह होते. ज्योती सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून संबंधित एजंट्सच्या संपर्कात राहिली. तिने सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने माहिती शेअर केली शिवाय तिने संवेदनशील माहितीही शत्रूंपर्यंत पोहोचवली.
पोलिसांनी ज्योती मल्होत्राची चौकशी सुरू केली आहे. दानिशशी ओळख झाल्यानंतर ज्योती दोनवेळा पाकिस्तानात गेली होती. तिथे दानिशच्या सल्ल्यानुसार ती त्याचा सहकारी अली अहवानला भेटली. अलीने ज्योतीची राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती. तसेच अली अहवानने पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱयांसोबत ज्योतीची बैठक आयोजित केली. तिथेच ती शाकीर आणि राणा शाहबाज या दोन व्यक्तींनाही भेटली. तिने शाकीरचा मोबाईल नंबर घेतला आणि जट रंधावा या नावाने सेव्ह केला. त्यानंतर ती हिंदुस्थानात परतली.