‘नरकातला स्वर्ग’ची पानं उघडली… तुडुंब गर्दी आणि अफाट प्रतिसाद

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची उत्सुकता साऱयांनाच आहे. देशभरात गेल्या दोन दिवसांपासून पुस्तकाची चर्चा होत आहे. अशातच शनिवारी उपस्थितांच्या तुडुंब गर्दीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर खचाखच भरले होते. पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्वांना प्रकाशन सोहळा पाहता यावा म्हणून बाहेर स्क्रीनवर व्यवस्था करण्यात आली होती.

प्रकाशनाच्या दिवशी ‘नरकातला स्वर्ग’ ला वाचकांचा दमदार प्रतिसाद लाभला. सभागृहाबाहेरील स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी झुंबड उडाली. पहिल्या दिवशी तीन हजार पुस्तकांची विक्री झाली.

एक लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा

प्रकाशन सोहळा सुरू होण्यापूर्वी ‘एक लढा-महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा’ ही ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. यातून संजय राऊत यांचा लढा, त्यांची अटक आणि सुटका असा धडाडीचा प्रवास दाखवण्यात आला. ती पाहून शिवसैनिकांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. पंढरीनाथ साबळे आणि श्रीराम मोडक यांनी ही ध्वनिचित्रफीत तयार केली. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ भरत सिंग यांनी केले. कार्यक्रमाचे रसाळ निवेदन स्मिता गव्हाणकर यांनी केले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, दिवाकर रावते, अनंत गिते, विनायक राऊत, भास्कर जाधव, अॅड अनिल परब, राजन विचारे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय देशमुख, प्रियांका चर्तुवेदी, आमदार सुनील राऊत, महेश सावंत, बाळा नर, ज. मो. अभ्यंकर, उपनेते आदेश बांदेकर, विनोद घोसाळकर, नितीन बानगुडे पाटील, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, प्रवक्त्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अनिल देशमुख , आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, दांगट न्यूज पेपर एजन्सीचे बाजीराव दांगट, डॉ. तात्याराव लहाने, काँग्रेस नेते सुनील केदार, उल्हास पवार आदी मान्यवरांसह राऊत कुटुंबीय उपस्थित होते.